बेने इस्रायल (हिब्रू : בני ישראל‎) म्हणजे इस्रायलचे पुत्र. हे मूळचे ज्यू म्हणजेच यहुदी. प्रचलित समज असा आहे की, दोन हजार वर्षांपूर्वी ज्यू समाजातील काही लोक त्या काळातल्या पॅलेस्टाइन म्हणजे सध्याच्या इस्रायलमधील धार्मिक जाचाला कंटाळून समुद्रामार्गे पूर्वेकडे निघाले. त्यातले एक गलबत फुटले आणि त्यातली सात जोडपी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग-नागावच्या किनाऱ्यावर आली.

स्थानिक जनतेने आश्रय दिल्यावर मूळचे उद्यमशील आणि कष्टाळू असलेले हे ज्यू प्रथम सुतारकाम, तेलाचे घाणे चालवणे अशा प्रकारचे लहान-मोठे व्यवसाय करून उपजीविका करू लागले. आपले पारंपरिक व्यवसाय सचोटीने करीत हा समाज कालांतराने रायगड जिल्ह्यातून मुंबई आणि ठाणे या परिसरात नोकरी-धंद्यासाठी स्थिरावला. बेने इस्रायली जमातीपकी जवळपास ऐंशी टक्के लोक महाराष्ट्रात राहतात, त्यातही अधिकतर लोक ठाणे परिसरात राहतात. काळाच्या ओघात ही यहुदी म्हणजेच ज्यू मंडळी स्थानिक समाजाबरोबर इतकी मिसळून गेली की काही चालीरीती वगळता त्यांचे परकेपण अजिबात शिल्लक राहिले नाही.

बेने इस्रायली मराठी संस्कृतीत इतके रमले की, त्यांना ‘स्थानिक यहुदी’ किंवा 'शनवार तेली' या नावानेही ओळखले जाते. ते मराठीत बोलतात. त्यांच्या प्रचलित मराठीला ‘जुदाव मराठी’ म्हणतात. ठाण्यातले हे यहुदी त्यांचे शायली हे मासिक मराठीत काढतात एवढेच नव्हे तर इस्रायलमध्ये स्थलांतरित झालेल्या बेने यहुदी लोकांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे मराठी भाषेचे वर्ग चालविले जातात.

मराठी भाषा, मराठी खाद्यपदार्थ, मराठी जीवनशैली हे सर्व अनेक शतकांपासून स्वीकारलेल्या या यहुदींना आपण मराठी असल्याचा अभिमान आहे. विवाहप्रसंगी मंगळसूत्र घालणे, हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात, प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात, मेणबत्तीचा वापर नाही, शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी, पुरणपोळी करतात.

हिंदूंच्या दिवाळीच्या सणाच्या जवळच यहुदींचा दिव्यांचा सण असतो. ज्युडाइसम हा त्यांचा धर्म आणि सिनेगॉग ही त्यांची प्रार्थनास्थळे. ठाण्याच्या परिसरात अशी सिनेगॉग आहेत. किहिमकर, रोहेकर, अष्टमकर अशी आडनावे लावणारे हे बेने इस्रायली हे गेल्या काही पिढय़ांपासून मराठी संस्कृतीशी पूर्णपणे समरस झालेले आहेत.

बेने इस्रायलीपैकी फक्त पोक्त माणसे जुदाव मराठी ही भाषा बोलतात.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.