महाराष्ट्र, भारतातील ठिकाण From Wikipedia, the free encyclopedia
पनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि.मी. अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचाच एक भाग झाला आहे.
पनवेल | |
जिल्हा | रायगड |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०२२ |
टपाल संकेतांक | ४१०-२०६ |
वाहन संकेतांक | एम. एच.४६ |
निर्वाचित प्रमुख | प्रशांत ठाकूर (आमदार) |
नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. भविष्यातील सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुंबई विमानतळ तालुक्यातील दापोली, कुंडेवहाल, भंगारपाडा गावांना लागूनच आहे. सिडकोने वसवलेले उलवे, खारघर, कामोठे, सेंट्रल पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत.
पनवेल हा आगरी तसेच कोळी कराडी संस्कृती असलेला तालुका आहे. तसेच शहरामध्ये भारताच्या विविध राज्यांतील म्हणजेच गुजरात, पंजाब, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोक मिळून मिसळून राहतात. पनवेल शहर हे विविधतेत एकता असलेले सुंदर शहर आहे.
पनवेल शहर हे गाढी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते. पनवेल समुद्रसपाटीपासून १२.१७५ मीटर उंचीवर वसलेले आहे. प्रबळगड, कर्नाळा किल्ला हे शिवकालिन दुर्ग शहरापासुन काही अंतरावर आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ३,७५,४६३ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५३ % तर महिला ४७ % आहेत. शहरातील ७८ % लोक साक्षर (पुरुष ८१ %, महिला ७४ %) असून १३ % लोकसंख्या ६ वर्षाखालील वयोगटातील आहे. पनवेल शहरावर पनवेल महानगरपालिका तर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे व कळंबोली यावर सिडको प्रशासन काम करते.
आगरी कोळी व कराडी संकृती असलेले पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. ह्या शहराला जुन्या काळात पानेली ह्या नावानेदेखील ओळखले जायचे. या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका होती. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० - १९१६ मध्ये युसुफ नुर मोहम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडून आले. समुद्रमार्गे व खुष्कीच्या व्यापारामुळे पनवेल प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.
पनवेल मध्ये जन्माला आलेल्या मोठ्या व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत-
पनवेल हे दिवा-पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल, अंधेरी-पनवेल (वडाळामार्गे) आणि रोहे-पनवेल या चार रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.