![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/95/Procession_at_Bangalore_during_Quit_India_movement%252C_by_Indian_National_Congress.jpg/640px-Procession_at_Bangalore_during_Quit_India_movement%252C_by_Indian_National_Congress.jpg&w=640&q=50)
भारत छोडो आंदोलन
8 ऑगस्ट रोजी गांधीजी च्या नेतृत्वाखाली सुरवात / From Wikipedia, the free encyclopedia
चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा ह्या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/95/Procession_at_Bangalore_during_Quit_India_movement%2C_by_Indian_National_Congress.jpg/640px-Procession_at_Bangalore_during_Quit_India_movement%2C_by_Indian_National_Congress.jpg)
या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १५जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. ह्या आन्दोलनाचे लोण शहरी भागासह ग्रामीण भागातही पसरले. तत्कालीन ग्रामीण भागातील अग्रनी कार्यकर्ते असणारे बुलडाणा जिल्ह्यातील, नागझरी गावचे रखमाजी कायंदे (सावकार) यांनी शेकडो कार्यकर्ते आपल्या स्वखर्चाने मुंबईला आंदोलनात सहभागी केले होते.
सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या ऐतिहासिक 'चले जाव' आंदोलनात ८ ऑगस्ट रोजी गोवालिया टँक मैदानावर ' वंदे मातरम् ' हे प्रेरणादायी, वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहीत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांनी झिंझोटी रागात तयार केलेल्या स्वकृत चालीत गाऊन सादर केले. यावेळी पेटून उठलेल्या भव्य जनसमुदयासमोर हे तेजस्वी गीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायक व कट्टर देशभक्त असलेल्या मास्तर कृष्णरावांचीच निवड करण्यात आली होती. या गीतावर इंग्रजांनी बंदी घातलेली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या गीताचे संपूर्ण कडव्यांसहित जाहीर गायन करणे हे फार मोठे धाडस होते. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.