From Wikipedia, the free encyclopedia
उमरगाम (उंबरगांव) (गुजराती: ઉમરગામ) हे वलसाड जिल्हा, गुजरात मधील एक नगर आहे. हे उमरगाम तालुक्याचे मुख्यालय आहे. ह्या गावाचे नाव घेतल्यास बहुतांश लोक आजही वृंदावन स्टुडिओ असलेले गाव असेच म्हणतील. इथली औद्योगिक वसाहत आणि समुद्रकिनारा देखील बहु परीचित आहेत. भारतातील नॅनो तंत्रज्ञानावर आधारित पहिला कारखाना येथील औद्योगिक वसाहतीत आहे [1].
उमरगाम नगर परिषदेत समुद्राजवळील नागरी वसाहत तसेच लोह मार्ग स्थानकाजवळील औद्योगिक वसाहत ह्यांचा समावेश आहे.
ह्या गावाचे मूळ नाव उंबरगांव असे आहे. गावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्रातील बहुतांश जनता अजून ह्याच नावाचा वापर करते. गुजरात मध्ये बोलीभाषेत ह्याचे नाव उमरगाम असे केले आहे. सरकारी कारभारात दोन्ही नावे वापरली जातात. खाली काही थोडी उदाहरणे दिली आहेत. अपेक्षित व्यवहाराप्रमाणे योग्य नावाचा वापर करावा.
उंबरगांव
उमरगाम
मिश्र वापर
१९६० मध्ये मुंबई इलाख्याच्या विभाजनाचे वेळी [11] हे गाव ठाणे जिल्ह्यातून सुरत जिल्ह्यात गेले. १ जून १९६४ रोजी वलसाड जिल्हा बनला त्या वेळेस हे गाव त्यात घेतले गेले.
डांग, उंबरगाव, बेळगाव, कारवारचा आपल्या राज्याला झालेला विरह अण्णाभाऊ साठे ह्यांनी ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ या लावणीतून मांडला[12].
उमरगाम हे मूलतः समुद्र किनारी वसलेले गाव आहे. उमरगाम आणि नारगोल ह्या गावांमध्ये तुम्ब नदीची खाडी आहे. औद्योगिक वसाहत उमरगाम रोड ह्या लोह मार्ग स्थानकाजवळ स्थित आहे.
इथे सीमा शुल्क खात्याचे कार्यालय आहे. काही शक्तीशाली नौका देखील तैनात असतात.
इथला दिपस्तंभ समुद्र पातळीपासून ३५ मी. उंच असून प्रकाश दर १५ सेकंदाने फेकला जातो[13].
राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय गणनेच्या वार्षिक अहवालांमध्ये उमरगामची गणना मासेमारीच्या प्रमुख बंदरांमध्ये होते. येथील नावा “UBR” अशा मालिकेत नोंदणीकृत होतात.
समुद्रा मुळे इथली आर्द्रता जास्त (४८% ते ८२%) असते[14].
उमरगाम नगरपालिकेची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३४,८३५ आहे. गावठाणची लोकसंख्या २७,८५९ असून त्यात १५,२१५ पुरुष आणि १२,६४४ महिला आहेत. औद्योगिक वसाहतीची लोकसंख्या ६,९७६ असून त्यात ३,७८८ पुरुष आणि ३,१८८ महिला आहेत[15].
येथील समुद्र किनारा प्रसिद्ध आहे.
वृंदावन स्टुडिओला अनेक पर्यटक सहली आलेल्या आहेत. रामायण, महाभारत आणि इतर अनेक मालिकांचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरण वृंदावन स्टुडिओ येथे झाले आहे. [16].
गावात गुजरात राज्य शैक्षणिक मंडळ तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाशी संलग्न अशा अनेक शाळा व कॉलेजेस आहेत.
१९१९ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीने येथील मावजी माधवजी इंग्रजी शाळा चालवायला घेतली. ह्या शाळेला वासुदेव गोपाळ परांजपे ह्यांचे मोठे योगदान लाभले.
दळणवळणाचे मुख्य साधन लोहमार्ग आहे. उमरगाम रोड (UBR) रेल्वे स्थानकावरून दोन्ही दिशांना जाणाऱ्या २८ गाड्या थांबतात. ह्या व्यतिरिक्त उमरगाम वलसाड मेमू (६९१५३) ह्या गाडीचे हे उगम स्थान आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ (तलासरी) गावठाण पासून साधारणतः २२ कि.मी. अंतरावर आहे. येथून रस्त्यानी इतर प्रमुख ठिकाणी जाता येते.
गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसेस गुजरातेतील तसेच महाराष्ट्रातील गावांपर्यंत जातात. उमरगाम ते अंबाजी ह्या जवळपास ६०० कि.मी. अंतराच्या प्रवासासाठी देखील बसेस आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.