From Wikipedia, the free encyclopedia
संगमनेर नगरपालिका कला, दामोदर जगन्नाथ मालपाणी वाणिज्य आणि बस्तीराम नारायणदास सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रयोगशील महाविद्यालय आहे.[1][2] राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समितीच्या (National Assessment and Accreditation Council) सप्टेंबर २०१६ साली झालेल्या पुनर्मूल्यांकनात या महाविद्यालयास 'अ +' श्रेणी मिळाली. सन २०२१ पासून महाविद्यालयास 'स्वायत्त' तेचा दर्जा मिळाला. [3]
शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर या संस्थेचे हे महाविद्यालय "संगमनेर महाविद्यालय" या नावाने परिचित असून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. हे महाविद्यालय, अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिले आणि जिल्ह्यातील दुसरे महाविद्यालय आहे. महाविद्यालयाचे औपचारिक उद्घाटन तत्काlIन संरक्षणमंत्री आणि माजी मुख्य मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याच्या हेतूने हे महाविद्यालय स्थापन करण्यात आले. ही संस्था नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मशताब्दी दिनास, २३ जानेवारी इ.स. १९६१ रोजी शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेरचे कार्यवाह श्री. शंकरराव गंगाधर जोशी यांच्या पाठपुराव्याने झाली. स्थापना करण्यात येथील सामाजिक नेते ॲड. भास्करराव उर्फ नाना दुर्वे, व्यापारी भिकुसा यमासा क्षत्रिय, ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात, वकील हिंमतलाल मगनलाल शाह, व्यापारी जगन्नाथ मालपाणी यांनी पुढाकार घेतला होता. प्रा. मधुसूदन विष्णू कौंडिण्य हे पहिले प्राचार्य होते. त्यांनी या महाविद्यालयासोबत १९९३ पर्यंत ३३ वर्षांची दीर्घ प्रचालकीय कारकीर्द पार पाडली.
शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना १९६० साली करण्यात आली, तर १९६१ साली कला व वाणिज्य शाखा आणि १९६५ साली विज्ञान शाखा सुरू झाल्या. [4] श. ना. नवलगुंदकर हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर डॉ. संजय ओंकारनाथ मालपाणी हे संस्थेचे विद्यमान (२०१६ साली) कार्याध्यक्ष आहेत[5] डॉ.अरुण गायकवाड यांची जुलै २०२१ प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.[6] "प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः" हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.
या महाविद्यालयाचा स्थापनेपासूनचा सर्व व्यवहार अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे.
गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर १९५९ रोजी पेटिट विद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती [7] [ दुजोरा हवा], त्यावेळी शंकरराव जोशी यांनी संगमनेर येथे महाविद्यालय सुरू करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. तसा प्रस्ताव मांडला. तो सर्वांनी उत्स्फूर्तपणे मान्य केला आणि तसा ठराव मंजूर करण्यात आला. त्यादिशेने संगमनेर नगरपालिका आणि शहरातील इतर तत्कालिन सुजाण व सुबुद्ध नागरिकांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी महाविद्यालयाची पहिली देणगी म्हणून पुणे विद्यापीठाचे शुल्क रु. ५००/- शंकरराव जोशी यांनी भरले, यावेळी यांचे वय ७३ होते.
२३ जानेवारी इ.स. १९६१ रोजी 'शिक्षण प्रसारक संस्था' स्थापन झाल्यानंतरच्या दरम्यान कॉलेज काढण्यासाठीची पुणे विद्यापीठाची अर्ज करण्याची मुदत जवळपास संपत आली होती. त्यावेळी संस्थेचे सचिव शंकरराव गंगाधर जोशी यांनी स्वतःचे रु. ५००/- (रु. पाचशे) डिपॉझिट म्हणून भरले. २४ फेब्रुवारी इ.स. १९६१ रोजी पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. शं. गो. तुळपुळे व प्रा. व. म. शिरसीकर यांनी भेट दिली व महाविद्यालयास मंजूरी दिली. कॉलेज सुरू करण्यासाठी इमारत म्हणून पेटिट विद्यालयाचा काही भाग तात्पुरता देण्याची विनंती गोखले एज्युकेशन सोसायटीला केली, पण त्यांनी नकार दिला.[8]त्यामुळे तीन महिन्यात प्राथमिक शाळा क्र. दोनच्या वर (जीवन शिक्षण मंदिर क्रमांक २ [9]) दोन मोठे हॉल बांधण्यात आले. त्यासाठी नगरपालिकेने रु. २५,००० (रु. पंचवीस हजार) खर्च केले.
१९ जून इ.स. १९६१ रोजी सायंकाळी गीता पठण, मंत्र जागरण व सत्यनारायण महापूजा करून नव्या इमारतीत महाविद्यालय सुरू करण्यात आले. सरस्वती पूजन समारंभ करण्यात आला. त्या समारंभाचे अध्यक्ष हिंमतलाल शाह उपस्थित विद्यार्थिवर्ग व नागरिक यांना म्हणाले, " तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही हे सारे करीत आहोत. आपल्या दिव्य यशाने तुम्ही आपल्या कुटुंबाला, संस्थेला, शहराला व राष्ट्राला ललामभूत ठराल, असा आमचा विश्वास आहे. ज्ञानाची गंगोत्री तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य जनतेने केले. त्याचा विपुल फायदा घ्या"[10] अशा रीतीने २० जून १९६१ रोजी महाविद्यालय सुरू झाले. [11]
महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षीच्या नियतकालिकात [12] १९ जून १९६१ रोजी सायंकाळी गीता पठण, मंत्र जागरण व सत्यनारायण महापूजा करून नव्या इमारतीत महाविद्यालय सुरू करण्यात आले आणि संगमनेर नगरपालिकेच्या स्मृतिग्रंथात [13] २० जून १९६१ रोजी महाविद्यालय सुरू झाले, असे म्हंटले तरी संस्थेने राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समितीस (National Assessment and Accreditation Council) ०५ जानेवारी २०१६ रोजी सादर केलेल्या स्वयं अभ्यास अहवालात स्थापना दिन १४ सप्टेंबर १९६१ अशी दिली आहे.[14] तथापि या तारखेचा संदर्भ दिलेला नाही.
संगमनेर नगरपालिकेस शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९६०-६१ हे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. ०३ मे १९६२ रोजी संगमनेर नगरपालिकेची शताब्दी साजरी करण्यात आली. तत्कालिन संरक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील या पहिल्या महाविद्यालयाचे कौतुक केले. ग्रंथालयासाठी रु. १०,०००/- (रु. दहा हजार)ची देणगी मुख्यमंत्री निधीतून जाहीर केली.
संगमनेर महाविद्यालयाचे आधीचे नाव 'संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय' असे होते. ते १९७० पर्यंत कायम होते, त्यानंतर ते संगमनेर नगरपालिका (?) कला आणि वाणिज्य महाविद्यालय असे करण्यात आले.[15]
व्यक्ती व संस्था यांच्याकडून मिळालेल्या देणग्या[17]
शहरातील संस्था व नागरिकांकडून[18]
विद्यार्थांचे श्रमदान[19] १९७२ च्या दुष्काळात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व ३०० विद्यार्थ्यांना दिलेल्या रोजगारातून महाविद्यालयात सर्व रस्ते तयार केले गेले. त्यासाठी लागणारी खडी शासनाकडून मोफत मिळविण्यात आली. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली.
मैत्री' मेळावा आणि 'मैत्री' कॅन्टीन
महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा घेण्याची पद्धत आहे. २०१५ या वर्षीच्या 'मैत्री' मेळाव्याचा आरंभ आणि 'मैत्री' कॅन्टीनचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अविनाश भोसले यांच्या हस्ते दि. २६ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आले. 'मैत्री' कॅन्टीनसाठी पुणे विद्यापीठाने यांनी आंशिक अनुदान दिले आहे. त्यावेळी अविनाश भोसले यांनी आणि अन्य माजी विद्यार्थी व मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश ओंकारनाथ मालपाणी यांनी मालपाणी उद्योग समूहातर्फे देणगी जाहीर केली. देणगीचा धनादेश ओंकारनाथ मालपाणी यांच्या पत्नी श्रीमती ललिताभाभी यांच्या हस्ते खजिनदार बिहारीलाल डंग यांना सुपूर्द करण्यात आला.
संगमनेर महाविद्यालय ५० एकर जागेवर आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी स्वतंत्र इमारती, साईबाबा सभागृह, क्रीडा मैदाने, वसतीगृहे, आदी सुविधा महाविद्यालयाच्या प्रांगणातच आहेत.
मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राच्या माध्यमातून रोजगारक्षम जोडशिक्षणाची सुविधा पुरवली जाते.[21][ दुजोरा हवा] प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य सरांनी मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राची उभारणी केली. या केंद्राच्या माध्यमातून सामाजिक जीवनात निरनिराळे शैक्षणिक प्रयोग केले.[22]बदलत्या काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानाचीही जोड अभ्यासक्रमांना दिली. स्थानिक पातळीवरच रोजगार कसे निर्माण होतील, याकडेही त्यांनी विषेश लक्ष तर पुरवलेच पण जरूर तेथे त्याकरिता गरजूंना बँकामार्फत योग्य अर्थसाहाय्य मिळण्यासाठीही प्रयत्न केले.[23]
महाराष्ट्र टाइम्सच्या ०२ फेब्रु. इ.स. २०१३ च्या अग्रलेखानुसार रोजगाराचे कौशल्य आणि मूल्यसंस्कार देणाऱ्या मुक्तांगण प्रकल्पास पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि इतर मान्यवरांचे पाठबळ लाभले. पु.लं.नी या कार्याचे महत्त्व जाणून संस्थेस आपल्या प्रतिष्ठतर्फे बारा लाख रुपयांची देणगी दिली.[24]. ३० मार्च १९९१ रोजी झालेल्या देणगी कोनशिला समारंभाच्या अध्यक्षपदी प्रा.मधु दंडवते होते.
इमारतीचे उद्घाटन कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांच्या हस्ते झाले.
'मुक्तांगण' परिसरात सध्याचे योग आणि निसर्गोपचार केंद्र आहे. या केंद्राचा फायदा अनेक लोकांना होत असून अनेक असाध्य आजार, व्याधी इत्यादीवर येथे उपचार केला जातो. तथापि वाढत्या प्रतिसादामुळे केंद्रासाठी नवी इमारत उभी राहात आहे.
महाविद्यालयास प्राचार्यांच्या हयातीत आणि प्रयत्नांमुळे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, नानाजी देशमुख, अजित वाडेकर, राजा गोसावी, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, गो. नी. दांडेकर, वि. म. दांडेकर, शरद पवार, माजी राज्यपाल आय. एच. लतीफ, बाबा आमटे, प्रकाश आमटे, इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या. आजही अनेक मान्यवर वेगवेगळ्या कारणांनिमित्त महाविद्यालयास भेट देत असतात.
कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये संशोधनाची सोय आहे. एम.फिल., पीएच्डीपर्यंत संशोधन करण्यात येते. पहिले प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य यांच्या स्मरणार्थ येथील संशोधन इमारतीस १६ मार्च २०१३ रोजी 'प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन' असे नाव देण्यात आले. वाणिज्य शाखा, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, तत्त्वज्ञान, बी. व्होकेशनल असे विभाग या इमारतीत असून तत्त्वज्ञान, बी. व्होकेशनल वगळता सर्व विभागांचे संशोधन केंद्र येथे आहे.
संस्था व महाविद्यालय यांची प्रगती आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमता दर्शविण्यासाठी २००० साली 'दर्शन' हा महाग्रंथ प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ कामगार नेते व आदिवासींसाठी काम करणाऱ्या भास्करनाना दुर्वे यांना समर्पित करण्यात आला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याने रु. २५,०००/- (रु. पंचवीस हजार)ची देणगी दिली.
या स्मरणिकेचे स्वरूप 'केवळ माहिती देणारे पुस्तक' असे न ठेवता तिला एका भरीव, संग्राह्य संदर्भग्रंथाचे स्वरूप येईल, अशी योजना केली. संगमनेर तालुक्याची भूतकालीन, वर्तमानकालीन सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, औद्योगिक, आर्थिक, कृषिविषयक, इत्यादी अंगानी पाहणी करून त्या आधारे भविष्यकालीन विकास कसा होईल, याची दिशा दाखविण्याचा प्रयत्न करावा, असे ठरले. त्यानुसार ग्रंथाचे पाच विभाग करण्यात आले :
ग्रामीण भागात विकासविषयक अपेक्षित असलेली जाग कोणती, याचा अनुभव या प्रत्यय या ग्रंथातून येतो. शैक्षणिक संस्था ज्या परिसरात कार्य करीत असते त्या परिसराशी, तिच्या प्रत्येक अंगाशी, त्या जीवनाशी ती बांधील आहे" या उत्कट जाणीवेतून ही ग्रंथ निर्मिती करण्यात आल्याचे संपादकीयात प्राचार्य म. वि. कौंडिण्य यांनी अतिशय सुस्पष्टरीत्या अधोरेखित केले आहे.
'दर्शन’ हा ग्रंथ संगमनेर तालुक्याचे सर्वांगीण 'दर्शन' घडविणारा संदर्भग्रंथ झाला आहे, असे मत पुणे विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू ग.स. महाजनी यांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हंटले आहे. ग्रंथाच्या दुसऱ्या विभागातील आशयाविषयी ते म्हणतात की " दिल्लीतील The Institute of Applied Economics या संस्थेने अशी आर्थिक पाहणी केली. प्रा. सी.डी. देशमुख यांनी स्वातंत्र्यापूर्वी कर्नाटकाची अशी पाहणी करून पुस्तक लिहिले. इंद्रायणी महाविद्यालयाने इंद्रायणी खोऱ्याविषयी असाच अहवाल लिहिला. पण या तिन्ही बाबतीत पाहाणी मर्यादित होती. प्रस्तुत 'दर्शन' ग्रंथात संगमनेर तालुक्याच्या माहिती बरोबरच वैचारिक लेख व व्यक्तिदर्शन या विभागामुळे एक जिवंतपणा आहे. वस्तुतः प्रत्येक तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची आणि देशाचीच अशी पाहाणी व्हायला हवी. " [25]
शिक्षणक्षेत्रातील लोकांनी असे हे प्राथमिक केल्यानंतर त्यात कोणती, कशी सुधारणा करावयाची याची आखणी राज्यकर्त्यांना करता येईल, असे प्रकल्प पथदर्शी ठरतील, असे मत डॉ. महाजनी यांनी व्यक्त केले आहे. ज्या तालुक्यात आपण शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहो त्या मातीचे आपण देणे लागतो ही या ग्रंथप्रसिद्धीमधील जाणीव मोलाची आहे. [26]संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे सर्व सहकारी ह्या सर्वांनी पुणे विद्यापीठाची "यः क्रियावान्स पंडितः " ही बोधोक्ति सार्थ केली आहे म्हणून त्या सर्वाना धन्यवाद"[27]
आधी वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेले कनिष्ठ महाविद्यालय नंतर स्वतंत्र करण्यात आले आहे. त्यासाठी नवी इमारत उभी करण्यात आली.
परिसरात जनतेची आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने विधी महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयास संस्थेचे माजी कार्याध्यक्ष (दिवंगत) ओंकारनाथ मालपाणी यांचे नाव देण्यात आले आहे.संगमनेर महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील ज्येष्ठ प्रा. ओंकार बिहाणी हे विधी महाविद्यालयाचे इन्चार्ज प्राचार्य आहेत.
संस्थेने शिक्षणशास्त्र विभाग स्थापन केला असून त्या अंतर्गत एक पदवी महाविद्यालय व पदविका महाविद्यालय सुरू आहे.प्रा. ज्युईली वेल्हाळ या शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत तर प्रा. सविता घुले या शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत.
महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये एकूण १६ पदवी आणि ११ पदव्युत्तर असे २७ पारंपरिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर बिझिनेस मॅनेजमेन्ट, व्होकेशनल कोर्सेस, कॉम्पुटर ॲप्लिकेशन, कॉम्पुटर सायन्स, वृत्तपत्रविद्या पदविका हे अभ्यासक्रम चालविले जातात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील २१३ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांपैकी संस्कृत आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्ययन व अध्यापन ज्या काही मोजक्या महाविद्यालयांत केले जाते त्यात संगमनेर महाविद्यालयाचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाची स्थापना १९६० साली आणि तत्त्वज्ञान विभागाची स्थापना १९६५ साली करण्यात आली. या दोन्हीही विषयांचे सामान्य (जनरल) स्तरावरील आणि विशेष (स्पेशल) स्तरावरील अध्ययन, अध्यापन व संशोधन होते. हे दोन्ही विभाग 'प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन' येथे आहेत.
संस्कृत हा विषय विशेष स्तरावर स. प. महाविद्यालय, पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, हंसराज प्रागजी ठाकरसी (एच्पीटी कॉलेज) नाशिक आणि संगमनेर महाविद्यालय अशा केवळ चार महाविद्यालयांत आहे. महाराष्ट्रातील दोन संस्कृत प्रगत केंद्रांपैकी पहिले पुणे विद्यापीठात आणि दुसरे पदव्युत्तर अध्ययन व संशोधन केंद्र संगमनेर महाविद्यालयात आहे. या संशोधन केंद्राची स्थापना २००४ साली झाली. शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्याध्यक्ष ओंकारनाथ मालपाणी यांच्या स्मरणार्थ मालपाणी परिवार विश्वस्त निधीने संस्कृत विभागास संशोधन व इतर शैक्षणिक उपक्रमांकारिता दहा लाख रुपयांची विशेष देणगी दिली आहे. त्या देणगीच्या व्याजातून संस्कृत पंडितास 'संस्कृतात्मा' पुरस्कार, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व ग्रंथ खरेदी हे उपक्रम राबवविले जातात
संस्कृत विभागः तथाच संकृतात्मा श्री. ओंकारनाथ मालपाणी पदव्युत्तर-संस्कृत-संशोधन-केन्द्रम्" असे या संस्कृत विभागाचे नाव आहे. या केंद्रात संस्कृत संवर्धन मंडळ व गीर्वाण भारती मंडळ यांच्यातर्फे विविध कायर्क्रम आयोजित केले जातात.
तत्त्वज्ञान हा विषय विशेष स्तरावर पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रात स.प. महाविद्यालय, पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, न्यू आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, अहमदनगर आणि संगमनेर महाविद्यालय अशा केवळ चारच महाविद्यालयांत आहे.
तत्त्वज्ञान विभाग अध्ययन, अध्यापन आणि विविध पातळीवर संशोधनात आघाडीवर आहे. विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास हेमाडे यांना विद्यापीठ अनुदान मंडळाने "माध्यमांचे तत्त्वज्ञान: समस्या आणि परिप्रेक्ष्य" (The Philosophy of Media:Issues and Perspectives) या प्रकल्पासाठी मेजर रिसर्च प्रोजेक्ट अंतर्गत अनुदान दिले आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कला विभागात सामाजिक विज्ञाने आणि मानव्य शाखेत, विद्यापीठ अनुदान मंडळाचा पहिला मेजर रिसर्च प्रोजेक्ट पुरस्कार मिळविण्याचा मान या विभागास मिळाला आहे.
विद्यार्थ्यांसाठी अध्ययनासाठी उपयुक्त वाचनसाहित्य व संदर्भ साहित्य मराठीतून उपलब्ध करून दिले आहे. तत्त्वज्ञानाचे अध्ययन व अध्यापन साहित्य मराठीतून उपल्ब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे."मराठीतून तत्त्वज्ञान निर्मिती" हा विभागाचा विशेष उपक्रम आहे. त्यासाठी तत्त्वज्ञान विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण केले आहे. महाराष्ट्रात तत्त्वज्ञान विषयासाठी वाहिलेले हे एकमेव संकेतस्थळ आहे; .त्याचा विद्यार्थ्यांसह अनेक तत्त्वज्ञानप्रेमी, चाहते यांना उपयोग होतो.
महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा घेण्याची पद्धत आहे. २०१५ या वर्षीच्या 'मैत्री' मेळाव्याचा आरंभ आणि 'मैत्री' कॅन्टीनचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अविनाश भोसले यांच्या हस्ते दि. २६ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आले. यानिमित्त प्रथमच माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला.
पहिले प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य यांना प्राचार्य कोगेकर अमृतमहोत्सव ट्रस्टतर्फे दिला जाणारा इ.स. १९९०चा "आदर्श शिक्षक' पुरस्कार, १९९१ चे जी. डी. पारीख ॲवॉर्ड, १९९२ चेएस.व्ही. कोगेकर ॲवॉर्ड, चतुरंग प्रतिष्ठान(मुंबई)चा इ.स. १९९३चा जीवनगौरव अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. संगमनेर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. केशव काशीनाथ देशमुख ह्यांना इ.स. २००७-०८ च्या पुणे विद्यापीठाच्या ’उत्कृष्ट प्राचार्य’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.[ दुजोरा हवा]
इ.स. २०१२ सालच्या "सकाळ करंडक' आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीत संगमनेर महाविद्यालय, संगमनेरच्या "कुक्कुटवध' एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.[28]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.