From Wikipedia, the free encyclopedia
वेदना (अन्य मराठी नावे: कळ) म्हणजे एखाद्या हानिकारक किंवा तीव्र कारकामुळे उद्भवणारी दुःखदायक जाणीव होय. वेदना हे न सहन होणारी संवेदना बहुतेक वेळा तीव्र किंवा हानिकारक उद्दीपनामुळे झालेली असते. उदाहरणार्थ ठेच लागणे, भाजणे, जखमेवर अल्कोहोलचा स्पर्श . आंतरराष्ट्रीय वेदना अभ्यास संघटनेच्या व्याख्येप्रमाणे “ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उतींच्या हानीबरोबर संबंधित असुखकारक आठवण म्हणजे वेदना.” वेदनेचे वर्णन करताना ते किती सहन होते किंवा सहन होत नाही अशा प्रकारे केले जाते. कोणत्याही प्रकारच्या शरीराच्या प्रत्यक्ष इजा किंवा इजेच्या कारणापासून वेदना शरीराचे रक्षण करते. भविष्यात अशा प्रसंगी होणारी हानि टाळता येते. वेदनेचे कारण दूर झाले म्हणजे वेदनेची तीव्रता कमी होते. शरीराला झालेली हानी बरी झाली म्हणजे वेदना होत नाहीत. क्वचित कोणत्याही प्रकारचे इजा होण्याचे किंवा रोगाचे दृश्य कारण नसताना सुद्धा वेदना होतात. वेदना होतात म्हणून वैद्यकीय सल्ल्यासाठी जाणा-या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे.पोटात दुखत आहे, डोके दुखत आहे, पाय दुखताहेत अशा कारणासाठी रुग्ण डॉक्टरकडे येतात. वेदनेमुळे रुग्ण अस्वस्थ होतो, नेहमीच्या कामात त्याचे लक्ष लागत नाही. समूहाबरोबर असणे, संमोहन, उत्तेजना, लक्ष दुसरीकडे जाणे, ताण अशा कारणामुळे वेदनेची तीव्रता बदलू शकते.
वेदना वर्गीकरण 1994 मध्ये इंटर्नॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ पेन यानी वेदनेचे पाच गट केले. 1. शरीराच्या कोणत्या भागात वेदना होते (उदा पोट, छाती, पाय वगैरे), 2. कोणत्या अवयवामधील बिघाडामुळे वेदना होतात (उदा पचनसंस्था, चेतासंस्था ), 3. वेदनेचा कालखंड आणि वेदना होण्याची पद्धत, 4. तीव्रता आणि वेदना होण्यास प्रारंभ होऊन किती वेळ झाला, 5. वेदनेचे कारण वरील वर्गीकरणापेक्षा अधिक सुलभ वेदनेचे वर्गीकरण पुढे आले त्यामध्ये वेदनेचे तीन गट केले आहेत. इजा झाल्यामुळे, दाह जन्य, आणि चेताजन्य. जुनाट वेदना – शारिरिक वेदना बहुतेक वेळा इजा होण्याचे कारण दूर झाल्यानंतर किंवा केल्यानंतर थांबते. पण सांधेदुखी, कर्करोग, चेता दाह, चेतापेशीवरील मायलिन आवरणाचा –हास अशा वेदनाना बराच काळ राहतात. अशा वेदना जुनाट (क्रॉनिक) समजल्या जातात. इतर वेदना तात्पुरत्या असतात. हे वर्गीकरण वेदना किती दिवसापासून आहेत यावर अवलंबून आहे. कोणत्या वेदना तात्पुरत्या आणि कोणत्या जुनाट यामध्ये मतभिन्नता आहे. पण 30 दिवसाहून अधिक काळ वेदना टिकून राहिल्यास त्यास जुनाट वेदना म्हणण्याची पद्धत आहे.
प्रत्यक्ष इजेमुळे झालेल्या वेदना: काहीं कारणाने परिघवर्ती मज्जातंतूंची टोके उद्दीपित झाली म्हणजे इजेमुळे झालेल्या वेदना होतात. यातील सर्वात सामान्य कारण म्हणजे भाजणे (थर्मल) , कापणे, आघातामुळे किंवा जड वस्तू हाता पायावर पडून इजा होणे(मेकॅनिकल) आणि रासायनिक वस्तूशी संपर्क उदा जखमेवर आयोडीन लावणे किंवा डोळ्यामध्ये मिरचीची पूड जाणे(केमिकल). इजा होणा-या वेदनेमध्ये आंतरांगिक, कायिक आणि कायिक पृष्ठ्भागावरील असे वर्णन केले जाते. आंतरांगिक अवयव कोणताही प्रत्यक्ष ताण सहन करू शकत नाहीत. उदाहरणार्थ रक्तवाहिन्या मोठ्या होणे किंवा रक्तवाहिन्यामधील अडथळा, अन्ननलिकेमधील अवरोध, मूत्रमार्गामध्ये अश्मरी (खडे). अशामुळे तीव्र वेदना किंवा दाह झाल्यासारख्या वेदना होतात. आंतरांगिक अवयवाना कापणे किंवा भाजणे यामुळे होणा-या वेदना कमी तीव्र असतात. आंतरांगिक वेदना त्यामुळे समजण्यास अवघड, प्रत्यक्ष खोलवर असल्या तरी बाह्य अंगावरील अवयवावरून सांगण्याचा प्रयत्न होतो. आंतरांगिक वेदनेबरोबर कधीकधी उलट्या, मळमळ अशी लक्षणे दिसतात. पिळवटून टाकल्यासारखे, खोलवर किंवा जड वस्तू आत असल्यासारखे असे वर्णन रुग्ण करतो. खोल कायिक वेदना स्नायूबंध, स्नायू, रक्तवाहिन्या, स्नायूआवरण, याना इजा झाल्याने होतात. हात पाय मुरग़ळणे, सांध्याना इजा, अस्थिभंग अशामुळे झालेल्या वेदना निश्चित सांगता येत नाहीत. याउलट त्वचा, त्वचेखालील उती, डोळा, कान, दात याना झालेली इजा तीव्र वेदनाजनक असते.
चेताउद्भवी वेदना चेताउद्भवी वेदना चेतास झालेल्या इजेमुळे किंवा चेतासंस्थेच्या भागास झालेल्या आजारामुळे निर्माण झालेल्या असतात. परिघीय चेताउद्भवी वेदना बहुतेक वेळा ‘दाह,मुंग्या आल्यासारखी, चमक आल्यासारखी, शूलसारखी किंवा टाचण्या आणि सुया बोचल्यासारखी अशा वर्णनाची असते.
अदृश्य वेदना:
वेदनेचा हा थोडा चमत्कारिक प्रकार आहे. शरीराचा एखादा अवयव अपघाताने किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर काढलेल्या भागामधून मेंदूकडे संवेद जात नाहीत. पण अशा व्यक्तीमध्ये काढलेल्या अवयवामध्ये वेदना होत असल्याचे जाणवते. अशा वेदनाना अदृश्य (फँटम पेन्स) म्हणतात. धडाच्या वरील भागातील अवयव जसे हात किंवा हाताची बोटे काढलेल्या 82% रुग्णामध्ये अदृश्य वेदनेची लक्षणे दिसतात. धडाच्या खालील भागातील अवयव उदा पाय काढलेल्या रुग्णामध्ये हेच प्रमाण 54% आहे. एका अभ्यासात अवयव गमावल्यानंतर आठदिवसानी 72% रुग्णाना अदृश्य वेदना जाणवायला लागल्या. सहा महिन्यानंतर 65% रुग्णानी आपल्या सर्जनकडे काढलेल्या अवयवामध्ये वेदना होत असल्याचे सांगितले. काहीं रुग्णामध्ये या वेदनांची तीव्रता कमी अधिक पण सतत होत असल्याची तक्रार केली. काहीं रुग्ण दिवसातून कमी अधिक वेळा किंवा आठवड्यातून एक दोन वेळेस अदृश्य वेदना होत असल्याचे सांगितले. या वेदनेचे वर्णन चिरडल्यासारखे, दाह, चाबूक लागल्यासारखे किंवा आकडी येत असल्याप्रमाणे केले. अशा वेदना बराच काळ होत राहिल्यास शरीरचा शाबूत भाग किंवा सामान्य अवयवाला स्पर्श केल्यानंतर अदृश्य वेदना परत चालू होतात असे दिसून आले आहे. कधीकधी या वेदनेबरोबर मूत्र किंवा शौच विसर्जन होते.
मानसिक वेदना : मानसिक, भावनिक किंवा वर्तन यामुळे मानसिक वेदनाना प्रारंभ होतो. अशा वेदना मानसिक त्रास वाढल्यास वाढतात किंवा बरेच दिवस होत राहतात. डोकेदुखी, पाठदुखी आणि पोटदुखी ही मानसिक वेदनेचे कारण असू शकतात. उदाहर्णार्थ परीक्षेच्या ताणामुळे विद्यार्थ्याना हमखास पोटदुखी सुरू होऊ शकते. नको त्या व्यक्ती समोर आल्यास डोकेदुखी सुरू झाल्याची तक्रार येते. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे अशा वेदना ख-या नाहीत हे ठावूक असले तरी त्यावर मानसिक उपचार करून त्या दूर करता येतात. उन्माद, मानसिक दुर्बलता सारख्या विकारामध्ये वेदनांचे कारण मानसिक असते.
पुनःपुन्हा होणा-या वेदना: या वेदना थोडा वेळ पण पुनःपुनः होत राहतात. बहुतांशी या कर्करोगामध्ये आढळून येतात. योग्य ती औषधे घेतल्यानंतर त्या कमी होतात पण पूर्णपणे थांबत नाहीत. रुग्ण आणि कर्करोगाचा अवयव याप्रमाणे याची तीव्रता बदलते. वेदना संवेद: वेदनेचा संबंध अक्षतंतूंच्या उत्तेजित होण्याशी आहे. मज्जारज्जू कडे वेदना संवेद ए-डेल्टा आणि सी अक्षतंतूमार्फत वाहून नेला जातो. त्वचा, केसांची मुळे, बोटे, अशा परिघवर्ती भागापर्यंत संवेदी अक्षतंतू आलेले असतात. अक्षतंतूंची टोके उष्णता, अपघात, थंडी, आघात, वजन अशा कारणामुळे उत्तेजित झाल्यास वेदना संवेद मज्जारज्जूकडे पाठवले जातात. एडेल्टा प्रकारच्या अक्षतंतूवर असलेल्या मायलिन आवरणामुळे असे संवेद 5-30 मीटर दर सेकंदास एवढ्या वेगाने मध्यवर्ती चेतसंस्थेकडे वाहून नेले जातात. वेगाने वाहून नेलेल्या वेदना संवेदामुळे अवयवाना व पर्यायाने शरीरास इजा होणे टळते. त्या मानाने सी अक्षतंतू कमी व्यासाचे व 0.5- 2 मी प्रतिसेकंद वेगाने संवेद वाहून नेतात. ए अक्षतंतूनी वाहून नेलेले वेदना संवेद तीव्र असून त्यांची जाणीव चटकन होते. अवयव बधिर होणे किंवा त्वचेची आघातानंतर आग होणे अशा वेदना सी अक्षतंतूमार्फत वाहून नेल्या जातात. वेदना सहन करणे : प्रत्येक व्यक्तीची वेदना सहन करण्याची शक्ती वेगळी असते. पुरुष वेदना सहन करतात पण स्त्रियाना वेदना सहजासहजी सहन होत नाहीत. पुरुषांची त्वचा जाड असते त्यामुळे अक्षतंतूंची टोके लवकर उद्दीपित होत नाहीत. अत्यंत लहान अर्भकाना वेदना होतात पण त्याना वेदना होतात हे सांगता येत नाही. सर्व वेदना संवेद मध्यवर्ती चेता संस्थेकडे वाहून नेले जात असले तरी प्रत्यक्ष मेंदूमध्ये वेदना वाहून नेण्यासाठी काहींही यंत्रणा नाही. मेंदूचे कितीही मोठी शस्त्रक्रिया साध्या भुलीखाली केल्या जातात. माशामध्ये वेदना वाहून नेणारे सी अक्षतंतू नसतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.