From Wikipedia, the free encyclopedia
विजय पांडुरंग भटकर (११ ऑक्टोबर १९४६, मुरंबा) हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत.
भटकर यांचे मूळ गाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा हे अडीचशे-तीनशे लोकवस्तीचे गाव. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात.
भटकर यांचे शालेय शिक्षण मूर्तिजापूर येथे झाले.[1] त्यांनी विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनीअरिंग कॉलेज, नागपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांना एम.टेक. साठी आयआयटी, मुंबईमध्ये प्रवेश मिळत होता.तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, वडोदरा येथेसुद्धा प्रवेश मिळत होता. त्यापैकी वडोदरा येथील विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.त्यांनी आयआयटी, दिल्ली येथून पी.एचडी. प्राप्त केली.
भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोकऱ्यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते.
विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी १९७२ साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. १९८२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७ मध्ये उपाध्यक्ष झाले.
भटकरांनी १९९३मध्ये परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.
त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.