वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.

वाल्मिकी ऋषी

मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत. रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.

जीवन

अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वालझरी हे गाव महर्षी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाते. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (जळगाव जिल्हा) यात याचा उल्लेख आहे. तसे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफीटेबल बुकमध्ये देखील याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. पृष्ठ क्रमांक ६४ वर उल्लेख केल्यानुसार, ‘रामायण’ या महाकाव्याचा रचयिता असलेल्या महाकवी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाणारे वालझरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिणेस पाच कि.मी. अंतरावर चाळीसगाव-पाटस रस्त्यावर आहे. या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी नदी वाहते आणि क्षेत्राच्या पायथ्याशी डोह आहे. तीर्थस्नानाच्या पूर्वभागी पाण्यापर्यंत जाता येईल अशी सोय केली आहे. या डोहाचे पाणी पवित्र मानले जाते. वाल्मीकीचे देऊळ म्हणून दाखविले जाणारे ठिकाण हे शंकराचे मंदिर आहे. यात जुनी शिवपिंड आहे. या पिंडीवरील देऊळ अतिशय पुरातन आहे. राम-लक्ष्मणाच्या मूर्ती असलेले एक लहान मंदिर आणि गोरखनाथ, वाल्मीकी यांच्या मूर्ती असलेली छोटी स्वतंत्र देवळे याच भागात आहेत. येथे पूर्व आणि पश्चिमेकडे एक मोठा वड आहे, जो महाकवी वाल्मीकींच्या काळातील असल्याची श्रद्धा आहे. एका मान्यतेनुसार, वाल्मीकी आधी लूटमार करायचे त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. त्यांनी एकदा काही ऋषींना घेरले. परंतु, त्या ऋषींनी त्यांना उपदेश केल्यानंतर त्यांना उपरती झाली. बसल्या जागी त्यांनी ऋषींनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वल्मीक म्हणजे वारूळ निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पुढे ‘वाल्मीकी’ असे नाव मिळाले, असे म्हणले जाते. वाल्मीकि मोठे शिवभक्त होते, अशी मान्यता आहे.

स्कंद पुराणानुसार, वाल्मिकी यांचा जन्म एका ब्राह्बत, लोहाजंघ (अग्नी शर्मा असे ही म्हंटले जाते इतर लेखनात) म्हणून झाला. एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला हा दुष्काळ पडल्याने चोर/डकैत झाला. असे म्हणले जाते पुराणात की त्यांनी सात ऋषी (सप्तर्षी) यांना ही लुटायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कडून विविध बोध मिळाले, व यांनी चोरीचा मार्ग सोडून, ऋषी पुलह यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्यांनी इतकी आराधना केली की आजूबाजूला मुंग्यांनी वारूळे बांधलेलीही त्यांना कळली नाहीत. जेव्हा सप्तर्षी परत आले, व त्यांनी हे बघितले, तेव्हा त्यांनी यांना वाल्मिकः (म्हणजे मुंग्यांचे वारूळ) मध्ये सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य, म्हणून वाल्मिकी, अशी पदवी दिली.

उत्तर कांड/शेष रामायणात ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात सीता शरण घेते, लव-कुशचा जन्मही त्यांच्याच आश्रमात होतो. लव व कुश वाल्मिकींचे पहिले शिष्य मानले जातात व बाल कांड रामायण त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आले. संपूर्ण रामायण गाथा ही ऋषी वाल्मिकी यांनी श्लोक शैलीत लिहिली. ते आपले पहिले कवी, म्हणून त्यांना आदी कवी, असे ही नमूद केले जाते.

असे म्हणले जाते की त्यांनी संत-कवी तुलसीदास यांच्या रूपात पुनर्जन्म घेऊन रामचरितमानस, हे अवधी-संस्कृतमध्ये लिहिले.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.