यमधर्म, यम किंवा यमराज ही हिंदू वेद पुराणांप्रमाणे मृत्यूची देवता तथा प्रथम पितर आहे. वैदिक परंपरेनुसार, यम हा पहिला मानव होता जो मरण पावला आणि मृत्यूचा अधिपती झाला. जुन्या लिखाणाप्रमाणे यमराज ही एक वैदिक देवता आहे. हा विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची आई होय. मात्र याच वेळी यमराज हे सूर्यपुत्र आहेत अशी ही धारण आहे. हा भेद पूर्वीच्या काळी अनेक यम झाल्याचे दर्शवते. तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( ऋ. १०.१६५.४ ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो. भगवान शनि महाराज हे यमाचे भाऊ आहेत. महाभारत काळात मांडव्य ऋषींच्या शाप वाणीमुळे विदुराच्या रूपात यमराजाचा जन्म पृथ्वीवर झाला होता. जो कोणी या पृथ्वीतलावर जन्माला येईल त्यालाही मरावे लागेल. पशू, पक्ष्यांपासून ते झाडे-वनस्पती, नद्या, पर्वत, सर्वांचा अंत निश्चित आहे. पण मृत्यूचा देव यमराज कोणाला कधी, कोणत्या ठिकाणी मरायचे हे ठरवतो. जीव घेण्याचा अधिकार यमराजालाच आहे. गरुड पुराण आणि कठोपनिषद ग्रंथात यमपुरी किंवा यमलोकाचा उल्लेख आहे. मृत्यूच्या बारा दिवसांनंतर, मानवी आत्मा यमलोकाचा प्रवास सुरू करतो.
स्वरूप
यम हा पिता, पितरांचा राजा , पहिला मर्त्य आहे असे मानले जाते. त्यांचे वाहन रेडा किंवा काळी म्हैस असून ते यमलोकात राहतात. कावळा आणि कबूतर हे यमराजाचे दूत आहेत. चार डोळे असलेले दोन कुत्रे यमलोकाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतात. नरक चतुर्दशीला भगवान सूर्यदेवाचा पुत्र मानल्या जाणाऱ्या यमराजाची विशेष पूजा केली जाते.
कथा
एके काळी यमुनेच्या तीरावर अमृत नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो रात्रंदिवस यमदेवतेची आराधना करत असे कारण त्याला अनेकदा स्वतःच्या मृत्यूच्या भीतीने पछाडले होते. एके दिवशी यमराज प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागायला सांगितले. अमृताने यमराजांना अमरत्वाचे वरदान मागितले. यमराजांनी त्याला समजावले की ज्याने जन्म घेतला आहे त्याला मरायचे आहे. यमराजाचे हे ऐकून अमृताने त्याला सांगितले की, जर मृत्यू टाळता येत नसेल तर किमान मृत्यू माझ्या अगदी जवळ असेल तेव्हा तरी मला कळावे म्हणजे मी माझ्या कुटुंबाची काही व्यवस्था करू शकेन. यानंतर यमराजांनी अमृतला मृत्यूची पूर्व माहिती देण्याचे वचन दिले. त्या बदल्यात यमाने अमृतला वचन देण्यास सांगितले की, मृत्यूची चिन्हे मिळताच तो जग सोडून जाण्याची तयारी करू लागेल. असे सांगून यमराज अदृश्य झाले.
अशी अनेक वर्ष उलटून गेली आणि अमृतने यमाच्या वचनाची खात्री पटल्याने सर्व देव साधना सोडून दिली आणि तो विलासी जीवन जगू लागला. त्याला आता मृत्यूची चिंता नव्हती. हळूहळू अमृतचे केस पांढरे होऊ लागले. काही वर्षांनी त्याचे सर्व दात तुटले, त्यानंतर त्याची दृष्टीही कमी झाली. तरीही त्याला कोणत्याही प्रकारे यमराजाचे संदेश अथवा चिन्ह मिळाले नाही. अशीच आणखी काही वर्षे गेली आणि आता तो अंथरुणावरून उठूही शकत नव्हता, त्याचे शरीर अर्धांगवायूच्या अवस्थेत पोहोचले होते. पण त्याने मनातल्या मनात यमाचे आभार मानले की मृत्यूचे कोणतेही चिन्ह पाठवले नाही. पन एके दिवशी तो चकित झाला, जेव्हा त्याने आपल्या जवळयमदूत आलेले पाहिले.यमदूतांनी त्याला यमराजाकडे नेले. तेव्हा अमृतने यमराजाला सांगितले की, तू मला मृत्यूपूर्वी कोणतीही चिन्हे अथवा संदेश दिले नाहीत. तेव्हा यमराजाने त्याला सांगितले की- मी तुला चार प्रमुख संदेश पाठवले होते, पण तुझ्या वासना आणि विलासी जीवनशैलीने तुला आंधळे केले होते, त्यामुले तुला ते दिसले नाहीत. आता हे संदेश लक्षपूर्वक ऐक.
- तुमचे केस पांढरे झाले हे पहिले लक्षण होते.
- सर्व दात गमावले, ते माझे दुसरे चिन्ह होते.
- तिसरे लक्षण म्हणजे जेव्हा दृष्टी गेली
- आणि चौथा संदेश तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांनी काम करणे बंद केले.
परंतु यापैकी कोणतीही लक्षणे समजू शकली नाहीत कार्ण तुझे कर्म योग्य राहिले नव्हते. त्यामुळे तुझा आत्मा आता शुद्ध करणे आवश्यक आहे.
सावित्रीची कथा: सावित्रीने यमराजापासून पतीचे प्राण कसे परत आणले अशीही एक कथा आहे.
कार्य
यमराजांचे मुख्य कार्य म्हणजे शिक्षेने आत्मा शुद्ध करणे. यमराज सर्व मृत आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात पाठवतात. यमराज सर्व मृत आत्म्यांना आश्रय देतात. म्हणूनच यमराजाला मृत्यूचा देव असेही म्हणले जाते. मृत्यू झाल्यावर सर्व प्रथम व्यक्ती यमलोकात जाते आणि तिथे यमराजांसमोर हजर केले जाते. त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचा विचार करून ते त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतात. ते नीतीने विचार करतात, म्हणून त्यांना 'धर्मराज' असेही म्हणतात. असेही मानले जाते की मृत्यूच्या वेळी केवळ यमाचे दूतच आत्मा प्राप्त करण्यासाठी येतात.
नावे आणी नक्षत्र देवता
यमराजाला भरणी नक्षत्राचे आराध्य दैवत मानले जाते. स्मृतींमध्ये चौदा यमांची नावे आली आहेत, ती पुढीलप्रमाणे- यम, धर्मराजा, मृत्यु, अंतक, वैवस्वत, काल, सर्वभूत, क्षय, उदुंबर, दघ्न, नील, परमेष्ठी, वृकोदरा, चित्रे आणि चित्रगुप्त.
“ | "यम गायत्री मंत्र":
ॐ सूर्य पुत्राय विद्महे । महाकालाय धीमहि । तन्नो यमः प्रचोदयात ॥ |
” |
स्थाने
यमराजाचे प्राचीन मंदिर हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात भरमौर नावाच्या ठिकाणी आहे. मंदिराला या भागात चार अदृश्य दरवाजे आहेत असे मानले जाते जे सोने, चांदी, तांबे आणि लोखंडाचे बनलेले आहेत. यमराजाच्या निर्णयानंतर यमदूत आपल्या कर्मानुसार आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरुड पुराणातही यमराजाच्या दरबारात चार दिशांना चार दरवाजांचा उल्लेख आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.