From Wikipedia, the free encyclopedia
माओ त्झ-तोंग, माओ झेडॉंग, माओ झेतांग (मराठी लिखाण : माओ त्से-तुंग); चिनी लिपीत: 毛泽东 ; फीनयीन: Mao Zedong / Mao Tse-tung) (जन्म : २६ डिसेंबर, इ.स. १८९३; शाओशान, हूनान, चीन; - ९ सप्टेंबर, इ.स. १९७६; पेकिंग, चीन) हा चिनी साम्यवादी क्रांतिकारक, राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ, चिनी राज्यक्रांतीचा प्रणेता, इ.स. १९४९ साली स्थापन झालेल्या चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या (ची.ज.प्र.) शिल्पकारांपैकी एक शिल्पकार व ची.ज.प्र.चा पहिला चेअरमन, अर्थात अध्यक्ष, होता. इ.स. १९४९ सालापासून इ.स. १९७६ साली मृत्यूपर्यंत त्याने देशावर एकाधिकारशाहीसारखा अंमल गाजवला. मार्क्सवाद-लेनिनवादांत माओने घातलेली सैद्धांतिक भर व माओची राजकीय, सैनिकी धोरणे यांना साकल्याने माओवाद या संज्ञेने उल्लेखले जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माओ त्झ-तोंग | |
जन्म | २६ डिसेंबर १८९३ शाओशान, हूनान,चीन |
---|---|
मृत्यू | ९ सप्टेंबर १९७६ बीजिंग, चीन |
माओचा जन्म डिसेंबर २६, इ.स. १८९३ रोजी चीनच्या हूनान प्रांतातील शाओशान या गावी झाला. त्यावेळी चीनमध्ये मांचू घराण्याची राजवट होती. मांचू घराण्याविरुद्ध चीनमध्ये लोकशाहीवादी चळवळीला सुरुवात झाली. इ.स. १९११ मध्ये कुओमिंतांग पक्षाने राजेशाही संपुष्टात आणून लोकशाही स्थापन करण्यास पुढाकार घेतला. त्या पक्षाचे एक सक्रिय सदस्य म्हणून माओ ओळखले जात.
१ जानेवारी इ.स. १९१२ रोजी सन्यत्सेन यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये नवे सरकार स्थापन करण्यात आले. त्यावेळी नव्या लोकशाही सरकार विरुद्ध लष्करी सत्ता उभी होण्याचा प्रयत्न करू लागली. सन्यत्सेनच्या मृत्यूनंतर चॅंग कै शेक हे पक्षप्रमुख झाले. तेव्हा मार्क्स-लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित होवून माओंनी चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. मात्र चीनमध्ये कामगाराऐवजी शेतकऱ्याला महत्त्व देण्यात आले. इ.स. १९२० पासून माओ नव्या पक्षात सक्रिय झाले, तर चॅंग कै शेक हे आपल्या क्वोमिंतांग पक्षाशीच एकनिष्ठ राहिले.
सरंजामशाहीविरुद्ध चळवळ उभी करणे हेच माओ यांचे मुख्य ध्येय बनले. या कामासाठी जुन्या क्वोमिंतांग पक्षाचीही मदत घेण्याचे ठरले होते. इ.स. १९२७ येईपर्यंत क्वोमिंतांग-कम्युनिस्टांचे सख्य संपल्यावर क्वोमिंतांग पक्षाच्या लोकांची सर्रास कत्तल सुरू झाली. तर दुसरीकडे माओ आणि त्यांच्या समर्थकांनी जमीनदारांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्यांना वाटण्यास सुरुवात केली. यामुळे माओंना लोकांचा पाठिंबा मिळू लागला. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर इ.स. १९३० पासून चॅंग कै शेक यांच्या क्वोमिंतांग पक्षाविरुद्ध कम्युनिस्ट रेड आर्मीचे युद्ध् सुरू झाले. कम्युनिस्टांविरुद्ध काढण्यात आलेल्या चार मोहिमांमध्ये चॅंग कै शेकना अपयश आले. मात्र पाचव्या मोहिमेत चॅंग कै शेकना यश आले, कम्युनिस्टांना युद्धातून माघार घ्यावी लागली.
हा पराभव माओ यांच्या जिव्हारी लागला. आपले ८५००० वर सैन्य, १५०० वर सैनिक घेऊन माओ चीनमधील ११ प्रांतांत वर्षभर फिरत राहिले. इतिहासात प्रसिद्ध झालेली ही प्रदीर्घ चाल वर्षभराने शान्शी प्रांतात पोहोचली. माओंना त्यांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविता आले होते, लोकांनी त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा दिला.
एकीकडे माओंचा लॉंग मार्च सुरू असतांना जपानने चीनवर आक्रमण केले. यावेळी क्वोमिंतांग आणि कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र येऊन जपानी सेनेविरुद्ध लढा द्यावा अशी भूमिका माओंनी घेतली. दोन्ही पक्षांत मतभेद दिसताच चॅंग कै शेकला अटक करण्यात आली. पण परक्या सेनेसमोर मतभेद उघड होवू नये म्हणून लगेच चॅंग कै शेकची सुटका करण्यात आली. इ.स. १९३८ ते इ.स. १९४५ या काळात माओंच्या नेतृत्वात दोन्ही पक्षांच्या सहकार्याने जपानशी युद्ध झाले. इ.स. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धात जपानचा परभाव झाल्यावर अमेरिकेने कम्युनिस्टांविरुद्ध चॅंग कै शेकला लष्करी मदत दिली. या मदतीमुळे इ.स. १९४६ पासून क्वोमिंतांग विरुद्ध कम्युनिस्ट असे सरळ युद्ध सुरू झाले. इ.स. १९४९ साली चॅंगच्या क्वोमिंतांग पक्षाचा दारुण पराभव झाला.
१ ऑक्टोबर इ.स. १९४९ला माओंच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जनता-प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. या प्रजासत्ताकाचे सर्व कामकाज सोव्हिएत संघातील पद्धतीने करण्याचे ठरविले गेले. हळूहळू माओंच्या लक्षात आले, की आपल्या देशातील कार्य पद्धती सोव्हिएत संघासारखी न ठेवता सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेतकऱ्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. लोकांकडून घेऊन लोकांना परत देणे अशी पद्धत सुरू झाली. ही नवी पद्धत वापरून शेती, विज्ञान, उद्योग अशा सर्व क्षेत्रात ची.ज.प्र.ने प्रगती केली.
सप्टेंबर ९, इ.स. १९७६ रोजी माओ यांचे निधन झाले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.