From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्र नाटक मंडळी ही मराठी नाटकांची निर्मिती करणारी नाट्यसंस्था होती. १० सप्टेंबर, इ.स. १९०४ रोजी हिची स्थापना झाली[1]. या मंडळीने कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित कीचकवध, भाऊबंदकी इत्यादी नाटके रंगभूमीवर आणली व ती नाटके विशेष गाजली. त्र्यंबक सीताराम कारखानीस, केशवराव दाते इत्यादी अभिनेत्यांनी या मंडळीची धुरा वाहिली.
खाडिलकरलिखित कांचनगडची मोहना या नाटकाचा प्रयोग करून या मंडळीने आपली वाटचाल आरंभली[1]. पुढे २२ फेब्रुवारी, इ.स. १९०७ रोजी खाडिलकरांच्याच कीचकवध नाटकाचा प्रयोग मंडळीने सादर केला. हे नाटक ब्रिटिश भारताचा तत्कालीन गव्हर्नर-जनरल जॉर्ज कर्झन याने केलेल्या बंगालच्या फाळणीच्या घटनेवर अप्रत्यक्षपणे टिप्पणी करणारे होते. ब्रिटिश भारताच्या प्रशासनाविरुद्ध लोकक्षोभ भडकवण्यास हे नाटक साहाय्य करेल, अशी शक्यता वाटल्याने २७ जानेवारी, इ.स. १९१० रोजी मुंबई प्रांताच्या शासनाने इ.स. १८७६ च्या ड्रमॅटिक पर्फॉर्मन्स ॲक्ट या कायद्याच्या कलम ३ अन्वये या नाटकाच्या सादरीकरणावर बंदी घातली [2]. सोळा वर्षांच्या बंदीनंतर इ.स. १९२६ साली मंडळीने या नाटकाच्या सादरीकरणास परवानगी मिळवण्यासाठी शासनाकडे अर्ज केला. त्यासाठी मंडळीने शासकीय समितीसमोर अमरावती येथे नाटकाचा खास प्रयोग करून दाखवला; तो पाहून शासकीय समितीने नाटकाच्या प्रयोगावरील बंदी उठवण्याची शिफारस केली. इ.स. १९२६ सालापासून महाराष्ट्र नाटक मंडळी कीचकवधाचे प्रयोग पुनश्च सादर करू लागली [2].
Seamless Wikipedia browsing. On steroids.