मधुगंधा कुलकर्णी या पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या स्नातक आहेत. त्या एक भारतीय मराठी लेखिका, नाटककार, चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांची चौथी कादंबरी प्रकाशित झाली होती. दिग्दर्शक परेश मोकाशी हे त्यांचे पती आहेत. मधुगंधा कुलकर्णी यांनी दूरचित्रवाणीवरच्या जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत विजया नावाच्या मोठ्या सुनेची (विजया) भूमिका केली आहे. येऊ घातलेल्या ’पक्या भाई’ या चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. 'लाली लीला'सारख्या नाटकामधून सशक्त अभिनेत्री म्हणून त्यांनी पूर्वीच लक्ष वेधून घेतले होते.
- एक एक क्षण (कथासंग्रह)
- एलिझाबेथ एकादशी - चित्रपट (निर्मिती, कथा, संवाद आणि पटकथा)
- तप्तपदी - चित्रपट (साहाय्यक संवादलेखक)
- त्या एका वळणावर (नाटक)
- पक्या भाई - चित्रपट (भूमिका)
- मंथन. (कादंबरी)
- लग्नबंबाळ (नाटक)
- होणार सून मी ह्या घरची - दूरचित्रवाणी मालिका (कथा)
- मधुगंधा कुलकर्णी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘लग्नबंबाळ’ या नाटकाने बरेच पुरस्कार मिळवले. हे नाटक १३०-१३५ प्रयोग झाल्यानंतर काही कारणास्तव बंद पडले होते. नवीन कलाकारांच्या साथीने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज आहे. रंगभूमीवर परतणाऱ्या या नाटकामध्ये श्रुती मराठे (राधा ही बावरी या दूरचित्रवाणी मालिकेमधली राधा) महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
- ’बांगड्या’ या लघुपटात मधुगंधा कुलकर्णी यांनी काम केले होते. ‘बांगड्या’ला सन २०१० मध्ये, फिल्म्सची पंढरी मानल्या गेलेल्या ‘कान फेस्टिव्हल’मध्ये सुरुवात करण्याचा मान मिळाला होता. २०१० साली गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हलला आमंत्रित केले गेले. पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी लघुपट महोत्सवांत ‘बांगड्या’ला ओपनिंग फिल्मचा मान देण्यात आला.
- अनामय संस्थेतर्फे १३ फेब्रुवारी २०११ पासून दर रविवारी दु. ४ ते ६ या वेळात चालणारे चार महिन्यांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात मधुगंधा कुलकर्णी आणि काही इतरांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले होते.
- पणजी (गोवा) येथे नोव्हेंबर २०१४मध्ये भरलेल्या ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी-२०१४) अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या हस्ते 'एलिझाबेथ एकादशी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी व लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
- फोंडा (गोवा) येथील शारदा ग्रंथप्रसारक मंडळातर्फे तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळ व कला व संस्कृती संचालनालय यांच्या सहकार्याने भरलेल्या १२ व्या गोमंत महिला साहित्य संमेलन पणजीत १९-२० ऑक्टोबर २०१४ या काळात झाले. मधुगंधा कुलकर्णी यांचा त्या संमेलनात सक्रिय सहभाग होता. संमेलनाच्या निमित्ताने संगीता अभ्यंकर यांनी कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेतली.
- मधुगंधा कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम व्हिवा लाउंजच्या निमित्ताने ६ मे २०१५ रोजी मुंबईत शिवाजी पार्क-दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात होणार आहे.