Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
पेंढारी किंवा पिंडारी या भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या होत्या, ज्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाचे लोक होते. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती.[1]
पेंढारी
पेंढारी : भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती. पेंढारी : मोगल साम्राज्याच्या पडत्या काळात व विशेषतः उत्तर पेशवाईत लुटालूट करून उदरनिर्वाह करणाऱ्या टोळ्यांस ही संज्ञा अठराव्या शतकात रूढ झाली. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल तज्ञांत मतभेद आहेत. काहींच्या मते ‘पेंढारी’ हा शब्द मराठी असून पेंढ व हारी या दोन शब्दांपासून झाला आहे व त्याचा अर्थ गवताची पेंढी किंवा मूठ पळविणारा असा होतो. उत्तरेत पिंडारी अशीही संज्ञा रूढ आहे. पिंड म्हणजे अन्नाचा घास. तो पळविणारा म्हणजे पिंडारी. भारतातील पेंढाऱ्यांप्रमाणेच लूटमार करणाऱ्या संघटित टोळ्या पश्चिमी देशांच्या इतिहासकाळातही उदयास आल्याचे दिसते. उदा., ब्रिगांड, फ्रीबूटर, बँडिट, फ्रीलान्स, डकॉइट इत्यादी. अशा प्रकारच्या संघटनांच्या उदयाची कारणे पुढीलप्रमाणे : (१) केंद्रीय राजसत्ता अस्थिर किंवा दुर्बल झाली, की सुभेदार-जहागीरदार व मांडलिक राजे यांच्यात सत्ता संपादनार्थ यादवी युद्धे सुरू होतात व अशा संघटनांना वाव मिळतो. (२) सत्तातंर झाले की पराभूत सत्ताधाऱ्यांचे सैनिक बेरोजगार होऊन लूटमारीस उद्युक्त होतात. (३) गरजू राजे व सरदार इत्यादींच्या आश्रयाने वा उत्तेजनाने दुसऱ्याच्या प्रदेशात लूटमार करण्यासाठी धंदेवाईक संघटना उभ्या राहतात. पेंढाऱ्यांच्या संख्येबद्दल व एकूण कारवायांबद्दल अनेक अतिरंजित कथा रूढ आहेत. कॅ. सीडनॅम याच्या मते माळव्यात त्यांच्या घोडेस्वारांची संख्या ३०,००० होती तर कर्नल जेम्स टॉडच्या मतानुसार ती संख्या ४१,००० होती. १८१४ मध्ये त्यांची संख्या साधारणत: २५,००० ते ३०,००० च्या दरम्यान असावी आणि त्यांपैकी निम्म्याहून कमी लोक शस्त्रधारी असावेत, असे बहुतेक इंग्रज इतिहासकारांचे मत आहे. प्रथम ते मराठी सरदारांबरोबर बाजारबुणगे म्हणून आढळात येऊ लागले. पुढे माळवा, राजस्थान, गुजरात, मुंबई इलाखा, मध्य प्रदेश वगैरे प्रदेशांत त्यांचा प्रभाव वाढला. त्यांची कुटुंबे विंध्य पर्वताच्या जंगलात, पर्वतश्रेणींत व नर्मदा नदीच्या खोऱ्यात असत. सुरुवातीला पेंढाऱ्यांमध्ये पठाण लोकांचा अधिक भरणा होता पण पुढे पुढे सर्व जातिजमातीमधील लोक त्यांत सामील झाले. पुष्कळदा रयतेकडून खंड वसूल करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले जाई. त्यातील काही भाग त्यांना मिळे. त्यांना नियमित वेतन नसे. खंडणी वसुलीसाठी ते मारहाण, दहशत, लुटालूट वगैरे मार्ग अवलंबित. त्यामुळे रयतेत त्यांच्याविषयी दहशत असे.
घोडा, लांब भाला (सु. ३.५ मी.) व तलवार हा त्यांचा मुख्य संरजाम असे. मोडकी पिस्तुले व बंदुकाही काहीजण वापरीत. दिवसाकाठी ५० ते ६० किमी. पर्यंत ते मजल मारीत. मुक्कामासाठी त्यांच्याजवळ तंबू, राहुट्या, पाले इ. सामान नसे. शत्रूवर पद्धतशीर हल्ला करण्याइतके ते खचितच शूर नव्हते पण सैन्य जाऊ शकणार नाही, अशा दुर्गम मार्गाने ते जात व अचानक हल्ले करून लूटमार करीत व धनधान्य नेत आणि जे पदार्थ नेता येत नसत, त्यांचा नाश करीत. त्यांच्या टोळ्यांना दुर्रे म्हणत. पेंढाऱ्यांच्या लहान टोळ्या लुटीला सोयीच्या असत. लूट, जाळपोळ, अनन्वित अत्याचार यांबद्दल त्यांची कुप्रसिद्धी होती. कित्येकदा एखाद्या गावास पूर्वसूचना देऊन ते खंड वसूल करीत व खंड न दिल्यास ते गाव जाळून टाकत. उत्तर पेशवाईत पेंढारी हे मराठी सैन्याचा एक भाग बनू लागले. त्यांत मुसलमान-हिंदू अशा दोन्ही धर्मांचे लोक होते पण दक्षिणी मुसलमान अधिक होते. त्यांच्या बायका सामान्यत: हिंदू ग्रामदेवतांची उपासना करीत. स्वारीहून परतल्यावर पुष्कळजण शेतीही करीत. चिंगोळी व हुलस्वार हे पेंढारी-पुढारी आपल्या अनुयायांसह पानिपतच्या युद्धात मराठी सैन्यात होते. इंग्रजी अमंलात पदच्युत झालेले संस्थानिक त्यांचे साहाय्य घेत. शिंदे-होळकरांकडील पेंढारी शिंदेशाही व होळकरशाही म्हणून ओळखले जात. टिपू व फ्रेंच यांचा पराभव झाल्यावर त्यांच्या विसर्जित सैन्यातून काही पेंढारी पथके बनली. एकोणिसाव्या शतकात काही संस्थाने खालसा होऊन इंग्रजी राज्य जसजसे दृढ होऊ लागले, तसतसे पेंढाऱ्यांचे आश्रयस्थान हळूहळू नाहीसे झाले. तेव्हा त्यांनी आपली स्वतंत्र पथके बनविली. हेरा व बुरन हे त्यांचे पुढारी होते. दोस्त मुहम्मद व चीतू नावाचे पुढारी पुढे प्रसिद्धीस आले. करीमखान हा पुढारी खानदानी मुसलमान कुटुंबातील होता. तो तरुणपणी प्रथम होळकरांकडे व नंतर शिंद्यांकडे गेला. शिंदे, भोसले व भोपाळचे नबाब यांच्याकडून तो पैसे घेई व लूट मिळवी. त्याच्या ताब्यात अनेक किल्ले होते. पुढे तो शिंद्यांनाही वरचढ झाल्यामुळे त्यांनी चीतूमार्फत त्याचा पराभव घडवून आणला. पुढे तो अमीरखानाकडे गेला. अमीरखान यशवंतराव होळकरांचा उजवा हात होता. वासिल मुहम्मद, नामदारखान, मीरखान इ. पेंढारी पुढारीही प्रसिद्ध होते. चीतूजवळ काही हजार घोडेस्वार, थोडे पायदळ व वीस मोडक्या तोफा होत्या. कादरबक्ष साहिबखान, शेखदुल्ला हे दुय्यम नेते होते. कोकणपासून ओरिसापर्यंतच्या प्रदेशांत त्यांनी धुमाकूळ घातला. मराठ्यांच्या साहचर्यातील पेंढाऱ्यांच्या लुटारूपणामुळे मराठेही लुटारू म्हणून बदनाम झाले. पेंढाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त लॉर्ड फ्रान्सिस रॉडन हेस्टिंग्जने केला (१८१८). त्याने अमीरखान व करीमखान यांना जहागिरी देऊन फोडले व इतर पेंढाऱ्यांचा बीमोड केला. यातूनच पुढे टोंक संस्थान उदयास आले. काही पेंढारी युद्धात मारले गेले, तर काही कायमचे अज्ञातवासात गेले. त्यामुळे उरलेल्यांनी लुटीचा व्यवसाय सोडला आणि ते मध्य प्रदेशात स्थायिक शेती करू लागले.
राजेमहाराजे-संस्थानिक, जमीनदार-सावकार आणि कष्टकरी-शेतकरी यांना आपल्या अधिपत्याखाली घेतल्यानंतर इंग्रजांची नजर जंगल संपदेवर होती. जंगलातील कच्चा माल इंग्रज बाहेर नेत. ब्रिटिशांनी सगळ्या आधुनिक कल्पना या आपल्या वसाहतीचे शोषण करण्यासाठी मॉडिफाय करून घेतल्या होत्या, त्यातलीच एक म्हणजे मुख्यभूमीवर तयार होणार कच्चा माल. उदा. नीळ, अफू, ताग, कापूस बंदरापर्यंत पोचवणे,त्याच्यासाठी प्रवासी अन् व्यापारी राज्यमार्ग सुलभ सुकर आणि सुरक्षित करणे. हा मार्ग अर्थातच जंगलातून किंवा त्याच्या आजूबाजूने जात होता. पण यात मुख्य अडसर लढाऊ आदिवासींचा होता. लढवय्या आदिवासींसमोर इंग्रजांना काही केल्या वर्चस्व गाजवता येत नव्हते. वास्तविक आदिवासी चळवळींचा इतिहास पार चौदाव्या शतकापर्यंत जातो. वेळोवेळी महंमद तुघलक, बिदरचा राजा, बहामनी सरदार यांच्याविरुद्ध एकजूट करून आदिवासींनी आपल्या ताब्यात असलेल्या जमिनी, किल्ले यांचे रक्षण केले होते. त्यामुळे इंग्रजांच्या काळातही त्यांना अनेक वेळा लढावे लागले. त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांना आदिवासींच्या जमिनी हडप करण्यासाठी स्थानिक जमीनदार आणि धनिक मदत करीत. १७८८ ते १७९५ या काळात छोटा नागपूर येथे तमाड जमातीने, १८१२ मध्ये राजस्थानात भिल्ल जमातीने, तसेच १८१८ ते १८३० ईशान्यपूर्व भारतात नागा, मिझो, लुशाई, मिशिपी, दफम्त इत्यादी जमातींनी, बिहारमध्ये मुंडा, कोल, खैरनार जमातींनी, १८३२ मध्ये संथालांनी इंग्रजांच्या कारवायांना कडाडून विरोध केला होता.
दुसऱ्या बाजूला सततची धुमश्चक्री, संस्थानिकांच्या कारभाराला लागलेली घरघर, जनतेकडून आकारण्यात येणारे विविध कर, सततचे पारतंत्र्य याने गांजलेल्या आणि भुकेकंगाल लोकांपैकी काहींनी मग सगळ्यात सोपा मार्ग निवडला, तो म्हणजे लुटमारीचा. अवध ते दख्खन या मध्य भारतातून जाणाऱ्या अनेक मार्गांवर व्यापारी, सावकार आणि काशी-बनारसला जाणाऱ्या यात्रेकरूंना लुटण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. कायदा-व्यवस्था पुरती ढासळली होती. या टोळीची दहशत इतकी भयानक होती, की तीर्थयात्रेला निघालेला माणूस निघताना घरदारावर तुळशीपत्र ठेवून बायकापोरांना कवेत घेऊन ओक्साबोक्शी रडत असे. ‘काठीच्या टोकावर सोन्याजडजवाहिरांचे गाठोडे बांधून काशीला निर्धास्त जावे’ इतका विश्वास त्याकाळात राहिला नव्हता. या लुटमार करणाऱ्या टोळ्या एका विशिष्ट जातीपुरत्या मर्यादित नव्हत्या, त्यात अठरापगड जातीची माणसे होती. आणि महत्वाचे म्हणजे समाजातल्या सगळ्यात खालच्या स्तरावरची ही मााणसं होती. जंगलाच्या मार्गावरून जाणाऱ्यांना लुटणारे जसे आदिवासी होते, हिंदू होते तसेच मुस्लिमही होते. अनेक संस्थानिकसुद्धा असे पेंढारी व लुटारू पदरी बाळगून त्यांच्याकडून पुंडगिरी करवून त्यांच्या मिळकतीवर जगत असत.
पेंढारींच्या बाबतीतही (पिंडारी) त्याकाळी अशाच आख्यायिका पसरवल्या गेल्या होत्या. असे म्हणतात की युद्धात अतिशय तरबेज असणारे पेंढारी सैन्य सबंध गाव लुटून न्यायचे. पेंढारींचा हल्ला होणार याची पुसटशी जरी शंका आली तर गावकरी स्वतःच आपले घरदार जाळून तिथून पोबारा करायचे. वास्तविक पेंढारी हा खरं म्हणजे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मात्र पेंढारी सैन्याने मोघल, राजपूत आणि पेशव्यांना अनेक युद्धांमध्ये मदत केल्याचे इतिहासात दाखले सापडतात. पेंढारी सैन्याचा उपयोग त्याकाळचे राजे-महाराजे हे आताच्या भाषेत सांगायचे झाले तर "आउटसोर्स' पद्धतीने करायचे. संस्थानिकांच्या कारभारला घरघर लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात सैन्य दल सांभाळणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नव्हते, त्यामुळे युद्धप्रसंगी बाहेरून पेंढारी सैन्याची मदत घेतली जायची. पहिल्या बाजीराव पेशव्याशी तर पेंढारीचे खुपच सलोख्याचे नाते होते. पेंढारींविरुद्ध ब्रिटिशांनी मोर्चेबांधणी केल्यानंतर या टोळीमध्य़े मोठ्या प्रमाणात फाटाफुट झाली आणि अनेक पेंढारी लुटमार करणाऱ्यांच्या टोळीमध्ये सहभागी झाले.
ठग : हे काली देवीचे उपासक असून देवीची कृपा संपादन करण्यासाठी आपल्या संघटित टोळ्यांतर्फे रक्त न सांडता नरबळी देण्याची त्यांची प्रथा होती. ठगांच्या टोळ्यांत हिंदू व मुसलमान या दोहोंचाही समावेश होता. कपटी किंवा धूर्त या अर्थाच्या संस्कृत ‘स्थग’ या शब्दापासून ठग किंवा ठक हे शब्द बनले आहेत. अचानकपणे व मनुष्य बेसावध असताना त्यास गळफास लावून ठार करण्याच्या कृत्याला ठगी म्हणतात. ठग व ठगीची उत्पत्ती कशी झाली, हे ठगाची जबानीवरून कळू शकते. रक्तबीजासुराशी कालीने युद्ध सुरू केले पण त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून असुर निर्माण होत व त्यांच्याही रक्तापासून असुर उत्पन्न होत. तेव्हा देवीने स्वतःच्या घामातून दोन पुरुष निर्माण केले. त्यांना स्वतःच्या पिवळ्या वस्त्राचा एक पट्टा दिला. त्या पट्ट्याने त्या पुरुषांनी असुरांना गळफास लावून ठार मारले. देवी प्रसन्न झाली आणि तिने मनुष्यांना फास लावून ठार मारण्याची व त्यांची संपत्ती घेण्याची आज्ञा त्या दोन पुरुषांना दिली. ठग हे त्या दोन पुरुषांचे वारस होत. या दंतकथेचे मूळ सप्तशतीत सापडते.
संघटित वाटमारीची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. मध्ययुगीन इतिहासकार जियाउद्दीन बरनी याने जलालुद्दीन खल्जीच्या कारकीर्दीत (१२९०-९६) एक हजार वाटमाऱ्यांच्या टोळीचा निर्देश केला आहे. बंगालमध्ये या वाटमाऱ्यांना हद्दपार करण्यापूर्वी त्यांतील प्रत्येकाच्या पाठीवर ओळख पटावी म्हणून डाग देण्यात आले. औरंगजेबाच्या काळात आलेला एक यूरोपीय प्रवासी जॉन फ्रायर याने वाटमारी करणाऱ्या टोळ्यांचा उल्लेख केला आहे. सतराव्या शतकातील झां बातीस्त ताव्हेर्न्ये (१६०५-८९) या फ्रेंच प्रवाशाला ठगीची पुसट माहिती असावी, असे दिसते. वाटमारी करणारे सर्व ठगच होते, असे म्हणणे कठीण आहे. ठगांचा खरा उपद्रव अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मोठ्या प्रमाणात वाढला. पेंढारी व इतर लुटारू जनतेची लूटमार करीत. तत्कालीन संस्थानिक व त्यांचे अधिकारी लुटारूंना वचकून असत. तसेच आर्थिक लाभासाठी अशा लुटारूंना ते पुष्कळदा आश्रयही देत. हिंदुस्थानात अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजी सत्ता स्थिर होऊ लागली होती. १७९९ च्या सुमारास इंग्रज-टिपू युद्धसमयी इंग्रजांना प्रथम ठगीचा सुगावा लागला. पेंढारी, ठग, डाकू यांचा उदय व इंग्रजी सत्तेचा विस्तार यांचा अन्योन्य संबंध दिसतो. वाढत्या इंग्रजी सत्तेमुळे देशातील विस्थापित राजांचे सैनिक बेरोजगार झाले. त्यांपैकी बरेच जण डाकूगिरीकडे वळले. इंग्रजी सत्तेच्या स्थापनेपासून जी पिळवणूक झाली, त्यातून बंगाल-बिहारमध्ये १७७० मध्ये पडलेल्या दुष्काळात कोट्यावधी लोक मरण पावले वा परागंदा झाले. तेव्हा लूटमारीबरोबर धार्मिक प्रथेचा आधार घेऊन बरेचजण ठगीकडे वळले असण्याचा संभव आहे. ठगी व डाकूगिरीच्या नायनाटासाठी एकोणिसाव्या शतकात डकॉइटी व ठगी नावाचे एक खाते ब्रिटिशांनी उघडले. तत्पूर्वी महादजी शिंदे, हैदर अली, म्हैसूरचा दिवाण इत्यादींनी ठगींचा नायनाट करण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु ते अयशस्वी झाले. गर्व्हनर जनलर ⇨लॉर्ड विल्यम बेंटिंगने १८२९ च्या सुमारास ठगीच्या निर्मूलनाची मोहीम हाती घेतली. बंगाल सेनेचा एक अधिकारी कॅप्टन विल्यम श्लीमान याने प्रत्यक्ष कामगिरी बजावली. त्याच्या व त्याचा सहकारी विल्यम थॉर्नटन याच्या अहवालानुसार ठगांविषयी पुढीलप्रमाणे माहिती मिळते : मध्य हिंदुस्थान, म्हैसूर व अर्काट या प्रदेशांत ठगीचा सुळसुळाट होता. ३०० ठगांची एक टोळी असे परंतु बळी घेण्याच्या कामगिरीसाठी ते छोटे गट करीत व सावज हेरल्यावर ते गट एकत्र येत. यात्रेकरूच्या मिषाने ते निःशस्त्र हिंडत. साधारणपणे पावसाळा सोडून ठगीचा उद्योग चालत असे. सावज हेरल्यावर त्याच्याशी मैत्री करत. पुढाऱ्याचा इशारा मिळताच बेसावध असलेल्या सावजावर हल्ला करून एका टोकाला गाठ असलेल्या पिवळ्या पट्ट्याने त्यांना फास देऊन, पायाला झटका देत व त्यांची मान मोडून (पण रक्त न सांडता) त्याचा बळी घेत. गळफासाला ‘नागपाश’ म्हणत. आधीच उकरलेल्या खड्ड्यात बळीला पुरून टाकत. जंगल व त्यातील वाटा, कोरडे ओढे-नाले, वाळवंटी जमीन अशा जागी बळी घेतला जाई. श्लीमानला आधी उकरून ठेवलेले २५४ खड्डे सापडले होते. कधी कधी हाती लागलेल्या मुलांना आपल्या पंथात घेऊन ठगीची दीक्षा देत. ठगीचा धंदा गुप्त ठेवला जाई व कित्येकदा घरातील बायकांनाही त्याची कल्पना नसे. गळफास देण्यात पटाईत व ज्याच्या घराण्यात परंपरागत ठगी आहे, अशा व्यक्तीस टोळीचा जमादार वा सुभेदार नेमत. त्यांची सांकेतिक भाषा होती. बळी देण्यापूर्वी शकुन (कालपाश योग) पहिला जाई. खड्डे उकरण्याच्या कुदळीला पूज्य मानले जाई. हातातून कुदळ पडणे हा मोठा अपशकुन मानला जाई. जमीनदार, अंमलदार यांच्यात तसेच देवीच्या पूजेसाठी ठगांच्या कुटुंबकल्याणासाठी आणि टोळीच्या सुभेदारास फास घालणारा व इतर ठग यांच्यात ठराविक प्रमाणात लूट वाटली जाई. ठगांच्या बंदोबस्तासाठी श्लीमानने दोन उपाय योजिले होते : एक, ठगांच्या टोळ्यात सामील होणाऱ्यास जन्मठेप देण्याचा कायदा व दुसरा, ज्या ठगाचा गुन्हा पूर्णपणे सिद्ध झाला होता, त्यास माफीचा साक्षीदार बनवून त्याच्याकडून इतर ठगांची माहिती मिळविणे. अशा उपायांनी १८३१ ते १८३७ या सात वर्षांत ३,००० ठगांना शिक्षा करण्यात आली व अनेकांना फाशी देण्यात आले. श्लीमानचा रिपोर्टं ऑन द ठग गँग्ज (१८४०) हा अहवाल प्रसिद्ध झाला. थॉर्नटनने इलस्ट्रेशन्स ऑफ द हिस्टरी अँड प्रॅक्टिसिस ऑफ द ठग (१८३७) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. १८४० सालापूर्वीच्या तीनशे वर्षांच्या काळात सु. ४० हजार माणसे ठगांच्या गळफासाला बळी पडली असावी, असा अंदाज केला जातो, कॅप्टन श्लीमानचा नातू जेम्स श्लीमानच्या म्हणण्याप्रमाणे रमजान नावाच्या ठगाने सु. १,७५० व रामबक्ष याने सु. ७०० व्यक्तींचे बळी घेतले.
कसा निर्माण झाला पेंढारी समूह
छोटी मोठी खेडेगावात राहणारी काही अनेक समाजाचे लोक, त्यांच्या कडून रागाच्या भरात घरघुती वादविवाद होत असे. व त्यांच्या कडून खून, किंवा बलात्कार अनेक विविध घटना हातून घडत असत. गावातील मुख्य लोक त्यांना शिक्षा म्हणून त्यांना दोषींना किंवा त्यांच्या परिवाराला गावातून हाकलून लावत असे आणि त्यांना समाजातून जातीतून बहिष्कार करून त्या व्यक्तीस किंवा त्या व्यक्तीच्या संपूर्ण परिवारास बाहेर काढून टाकस असत. व गावातील मुख्य लोक किंवा पंच सरपंच लोक आजू-बाजूच्या गावात सूचना देत असत कि अनोळखी अमुक-अमुक राहायला येईल त्यां गुन्हेगार प्रवृत्ती लोकांना तुम्ही आश्रय देऊ नये. मग ती गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोक जंगलात आश्रय घेऊ लागलीत व बघता बघता खूप सारी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक एका ठिकाणी जमा होऊ लागलेत. व मनात बदला घेण्याची वृत्ती जागृत करत ते समूह एकत्र येऊन गावातील लोकांवरील हल्ला करीत असे व लुटमार करून धन, धान्य, जीवन उपयोगी लागणारे वस्तूची लुटालूट करीत असे. त्यांना ठार मारत असे. बलात्कार करून जिवंत मारून संपूर्ण गाव जाळून टाकत असे. असे करताना ते जात धर्म पाहत नसे. त्यांची शास्त्रे म्हणून तलवार, ढाल, भाला, घोडे. बारूद जवळ बाळगळत असे. व पुढे आयुष्य जगण्यासाठी विविध गावात जाऊन हल्ले, लुटमार करीत जे मिळेल ते घ्यायचे व पुढचे गाव लुटायची योजना आखायचे. युद्धप्रसंगी राजा/संस्थानिकांसाठी लढाया करत. त्याच्या मोबदल्यात राजाकडून एखादे गाव लुटायची परवानगी मागत. त्यांची गाव लुटायची कार्यपद्धती अतिशय भयानक असे. धन, सोने व इतर मौल्यवान वस्तू कुठे आहे, हे सांगावे म्हणून गावकऱ्यांच्या तोंडात गरम कोळसे-राख भरणे, महिलांवर बलात्कार करणे, अंगाला चटके देणे, लहान मुलांना मारून त्यांना भाल्याच्या टोकावर नाचवणे, असे भयानक प्रकार असत.
पेंढारी, दरोडेखोर आणि ठग व डाकू
मराठी शब्दकोशात 'पेंढारी हा शब्द लुटारूंचा समुदाय म्हणून ओळखला जातो. उत्तरेत अर्थात महाराष्टाच्या वरच्या भागात 'पिंडारी' अशीही संज्ञा रूढ आहे. पूर्वीच्या काळी ठग लोकही लुटारू होते. पण 'ठग' आणि 'पेंढारी' या दोन्ही संज्ञा वेगवेगळ्या ('डाकू' सुद्धा!) असून दोघांच्या कार्यपद्धतीत देखील तफावत आढळते. ठग बेसावध असलेल्या सावजावर हल्ला करून एका टोकाला गाठ असलेल्या पिवळ्या रुमालाने किंवा पट्ट्याने गळ्याला फास देऊन, पायाला झटका देत, पण रक्त न सांडता त्याचा बळी घेत व त्याच्याकडील धन लुटत.
'पेंढारी' शब्दाच्या व्युत्पत्ती बद्दल मतभेद आहेत. हिंदी भाषेत त्यांना 'पिंडारी' म्हणतात. सर्वमान्य तर्क हा की 'पेंढारी' शब्द मराठी भाषेतून आला आहे. कदाचित 'पेंढा' नावाची दारू पिणारे हे लोक असत.
सविस्तर माहितीसाठी
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याकडे पेंढारी या इतिहासाची संपूर्ण सविस्तर माहितीची नोंद आपणास पाहायला मिळेल.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.