From Wikipedia, the free encyclopedia
दीनानाथ दलाल - पूर्ण नाव नृसिंह दामोदर दलाल नाईक - (जन्म : मडगाव (गोवा), मे ३०, १९१६ - जानेवारी १५, १९७१) हे वाङ्मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरता, मुखपृष्ठांकरता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार होते.
१९३७ मध्ये जी.डी. आर्ट ही परीक्षा उत्तीर्ण होताच दलालांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली. १९४४ मध्ये दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना करून दलालांनी मराठी प्रकाशनविश्वात पुस्तकांची मुखपृष्ठे, अंतरंगचित्रेरं रेखाटण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच लोकांना त्यांच्या कामातील कलात्मक ताकदीचा परिचय होऊ लागला. मराठी पुस्तकांचा चेहरामोहरा बदलू लागला. कारण, आता प्रकाशनविश्वात ‘दलाल-पर्व’ सुरू झाले होते. नवे मराठी पुस्तक आणि दलालांनी रंगवलेले मुखपृष्ठ असे जणू समीकरणच झाले होते. त्या काळात दलाल नावाची मोहिनी मराठी रसिकांवर पडली होती
दलालांची चित्रे हिंदुस्थानी मातीशी नाते सांगणारी होती. आपल्या जीवनातले रंग घेऊनच ती नटलेली होती. त्यांची रेषा अत्यंत सशक्त आणि लवचीकही होती. तिच्यात जोरकस प्रवाहीपणही होते आणि हळुवार लयकारीची नजाकतही होती. भारतीय पारंपरिक चित्रशैलींचे संस्कार त्यांच्या चित्रात दिसत. वास्तववादी चित्रणातील त्यांचे कसब वादातीत होते.
दीनानाथ दलालांना साहित्याची मनापासून आवड होती. कथा, कादंबरी, कविता, चरित्र, प्रवासवर्णन, वैचारिक, विनोदी, ललित, ऐतिहासिक असे सर्व साहित्यप्रकार त्यांच्यासमोर येत व त्यांना योग्य ते न्याय देणारे चित्र ते साकारत.
दलाल १९३८ च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या 'वैमानिक हल्ला' या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हणले आहे, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे, फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली.
इ.स. १९४५ मध्ये दलालांनी ‘दीपावली’ या वार्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. दर्जेदार साहित्य व दलालांच्या उत्तमोत्तम चित्रांनी सजलेला ‘दीपावली’ अल्पावधीतच लोकप्रिय झाला. रसिक आतुरतेने त्याची वाट पाहू लागले. हातांत व्यावसायिक कामे प्रचंड असूनही वेगळा वेळ काढून दलालांची स्वान्त सुखाय चित्रनिर्मिती चालू असे. भारतातील विविध चित्रप्रदर्शनांत त्यांचा सहभाग असे. दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात १३ वेळा दलालांची चित्रे पुरस्कारप्राप्त ठरली. गोवा, हैदराबाद, अमृतसर येथील प्रदर्शनांमध्येही त्यांच्या चित्रांना पुरस्कार मिळाले. दलाल आर्ट स्टुडिओतर्फे प्रकाशित झालेली ‘शृंगार नायिका’, ‘चित्रांजली’, ‘भारताचे भाग्यविधाते’, ‘अमृतमेघ’ ही सचित्र पुस्तके रसिकमान्य ठरली. १९७१ मध्ये दीपावलीचा ‘रौप्यमहोत्सव’ समारंभ पार पडला आणि वयाच्या ५४व्या वर्षी आपली चित्रमैफल अपुरी ठेवून हा कलावंत निघून गेला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.