दिनशा एडलजी वाच्छा (इ.स. १८४४ - इ.स. १९३६) हे एक पारशी भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक होते व १९०१ साली अध्यक्ष होते.[१]
वाच्छा मुंबईचे रहिवाशी होते.
कार्य
वाच्छा हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य कार्यकर्ते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे संस्थापक–सदस्य–अध्यक्ष होते. यांचा जन्म मध्यमवर्गीय, पारशी कुटुंबात मुंबई येथे झाला. आयर्टन स्कूल आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले (१८५८) आणि वयाच्या चौदाव्या वर्षी ते पदवीधर झाले. पुढे वडिलांच्या मुंबई व एडन येथील व्यवसायांत ते मदत करू लागले. समाजसुधारणा, शिक्षण आणि राजकारण या क्षेत्रांत दादाभाई नवरोजी आणि फिरोझशाह मेहता यांच्याबरोबर वाच्छांनी कार्य केले. प्रतिष्ठित सामाजिक संस्था आणि संघटनांशी त्यांचा सदस्य–कार्यवाह–अध्यक्ष या नात्यांनी निकटचा संबंध आला. रॉबर्ट नाइट या पत्रकारामुळे त्यांचा राजकारणातील उत्साह वाढला. मुंबई नगरपालिकेमध्ये त्यांनी विशेष रस घेतला तिचे ४० वर्षे ते सक्रिय सभासद होते. अखिल भारतीय काँग्रेसचे ते संस्थापक–सदस्य असून अनेक वर्षे कार्यवाह म्हणून काम केल्यानंतर १९०१ मध्ये ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचेही ते तीस वर्षे (१८८५–१९१५) कार्यवाह होते व पुढे त्याचे अध्यक्ष झाले (१९१५–१८). पीपल्स फ्री रीडींग रूम अँड लायब्ररीचे ते विश्वस्त आणि अध्यक्ष तसेच इंडियन मर्चन्ट्स चेंबरचे अध्यक्ष होते. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक, बॉम्बे मिलओनर्स असोसिएशनचे सभासद, बॉम्बे इंपीरिअलचे ट्रस्टचे सभासद, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचे संचालक, इंपीअरिअल बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर अशी अनेक उच्च पदे त्यांनी भूषविली. यांशिवाय बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल (१९१५–१६), इंपीअरिअल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल (१९१६-२०), काउन्सिल ऑफ स्टेट्स (१९२०) यांवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या बहुविध कार्याचा सन्मान ‘नाइट’ ही पदवी देऊन ब्रिटिश शासनाने केला (१९१७). नंतर ते ‘सर वाच्छा’ या नावाने परिचित झाले.
वाच्छांनी विपुल लेखन केले. त्यापैकी त्यांचे स्फुटलेखन तत्कालीन मान्यवर नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. याशिवाय त्यांनी भारताच्या आर्थिक प्रश्नावर, विशेषतः करविषयक धोरणावर, अत्यंत अभ्यासपूर्ण असे ग्रंथ लिहिले. त्यांच्या लेखनाचे विषय सकृत्दर्शनी अनेक असले, तरी देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक आणि राजकीय समस्यांच्या संदर्भात प्रगल्भ लोकमत तयार करणे, हा त्यांच्या लेखनाचा मूलभूत हेतू होता. त्यांचे स्फुटलेखन इंडियन स्पेक्टेटर, द ॲडव्होकेट ऑफ इंडिया, द बेंगॉली, द इंडियन रिव्ह्यू, द वेन्झ्डे रिव्ह्यू, द ओरिएंटल रिव्ह्यू, कैसर–ए–हिंद आणि बॉम्बे क्रॉनिकल या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. यांत प्रामुख्याने त्यांनी आर्थिक प्रश्नांचा ऊहापोह केला असून दादाभाई नवरोजी यांनी मांडलेल्या ‘आर्थिक शोषण’ सिद्धांताचे समर्थन केले आहे. या विषयाची सविस्तर व सोदाहरण चर्चा त्यांनी इंडियन रेल्वे फिनॅन्स, इंडियन मिलिटरी इक्स्पेंडिचर, राइझ अँड ग्रोथ ऑफ बॉम्बे म्यूनिसिपल गव्हर्न्मेन्ट, ॲग्रिकल्चरल बँक्स इन इंडिया या चार मान्यवर ग्रंथांत केली आहे. यांशिवाय त्यांनी माय रेकलेक्शन्स ऑफ बॉम्बे (१८६०–७५) या आत्मचरित्रपर पुस्तकात मुंबईसंबंधीच्या आपल्या काही आठवणी-अनुभव निवेदन केले असून त्यांतून चरित्रातील अनेक पैलू दृष्टोत्पत्तीस येतात.
फिरोझशाह मेहतांबरोबरच मुंबई महानगरपालिकेच्या आधुनिक घडणीमध्ये वाच्छांचा महत्त्वाचा वाटा आहे. १८९७ मध्ये लंडन येथे वेल्बी कमिशनपुढे देशाच्या आर्थिक समस्यांसंबंधी उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नवरोजी, फिरोझशाह मेहता, गो. कृ. गोखले वगैरे ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांबरोबर त्यांनी आपले विचार मांडले. गोखले आणि मेहता यांच्या निधनानंतरही मवाळांच्या उदारमतवादी पक्षाचे कार्य अखेरपर्यंत त्यानी पुढे चालू ठेवले. ते प्रखर राष्ट्रवादी, आर्थिक समस्यांविषयीचे प्रवक्ते आणि बांधिलकीचे समाजशिक्षक होते. वृत्तीने ते मवाळ असूनही त्यांनी ब्रिटिश शासनाला आर्थिक विषयांच्या बाबतीत अनेक वेळा कचाट्यात पकडले. लोकमान्य टिळकांनी ‘धीट, निर्भीड व हिशेबी कामात वाकबगार’ असा त्यांचा गौरव केसरीतून केला.
मुंबई येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.[२]
संदर्भ
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.