From Wikipedia, the free encyclopedia
अनंततनय ऊर्फ दत्तात्रेय अनंत आपटे (जन्म : बडनेर भोलजी-जिल्हा बुलढाणा, इ.स. १८७५; - पुणे, ११ जून, इ.स.. १९२९) हे एक मराठी कवी होते. ह्यांचे मूळ गाव जुन्नर. स्कूल-फायनलपर्यंत शिकल्यावर त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड येथे १२ वर्षे शिक्षकाची नोकरी केली. त्या काळात तेथील सत्पुरुष चंडिराममहाराज यांचे पद्यमय चरित्र त्यांनी लिहून प्रसिद्ध केले (१८९९) अनंततनय यांची बरीचशी कविता पुण्याच्या चित्रमयजगत् मधून प्रसिद्ध झाली आहे.
इ.स. १९२०मध्ये पुणे येथे कवी आणि काव्यरसिक यांच्यासाठी स्थापन झालेल्या ’श्री महाराष्ट्र शारदामंदिरा’चे ते आधारस्तंभ होते. ह्या संस्थेच्या वतीने नवीन कवितेविषयी समाजात आवड निर्माण करणे, कवींच्या काव्यकृती प्रकाशित करणे, कवीची चरित्रविषयक माहिती मिळवून ती प्रसिद्ध करणे, काव्यग्रंथांचा संग्रह करणे, कविसंमेलने भरवणे, काव्यविषयक चर्चा घडवून आणणे, असे विविध उपक्रम अनंततनय यांनी केले.
अनंततनय यांनी हृदयतरंग, पद्यदल, बालगीता, श्रीशारदादूतिका, पुण्याची पर्वती अशी वैविध्यपूर्ण काव्यरचना केली. सनातन धर्माचे स्वरूप, काव्यचर्चा, विनायकाची कविता अशा विविध ग्रंथांचे संपादन आणि संकलन त्यांनी केले. [ दुजोरा हवा].
....,....,...बंगाली गीतांचीही त्यांनी मराठीत भाषांतरे केली. जयदेव कवीच्या ‘मूळच्या संस्कृतमधील ‘गीतगोविंद` या काव्याच्या बंगालीतील अनुवादाचा अनंततनयांनी ‘राधामाधवविलास` नावाने मराठीत अनुवाद केला.[1][2]
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मुलींचे विवाह वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झोपाळे बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली, तर लहान वयात त्यांना चांगले ज्ञान मिळू शकेल, या उद्देशाने त्यांनी झोपाळ्यावरची गीता लिहिल्याचा उल्लेख त्यांच्या झोपाळ्यावरची गीतेच्या प्रस्तावनेत आहे. या श्लोकसंग्रहात भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांचा आशय असलेले श्लोक त्यांनी मराठीत लिहिले. मूळ भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या ७०० असून `झोपाळ्यावरच्या गीते‘मध्ये ५४६ श्लोक आहेत. श्लोकांची संख्या कमी असली, तरी त्यांमध्ये मूळ गीतेतील संपूर्ण आशय अत्यंत सोप्या शब्दांत देण्याचा कवी अनंततनय यांनी प्रयत्न केला आहे. या संग्रहाच्या तीन आवृत्त्या (इ.स. १९१७, १९१९, १९२८) निघाल्या होत्या. शंकर नरहर जोशी यांच्या चित्रशाळा प्रेसने त्या प्रकाशित केल्या होत्या. त्या वेळी त्याची किंमत केवळ चार आणे एवढी होती. या पुस्तकाचे पुनःप्रकाशन ऑगस्ट २०१५ मध्ये झाले.[1]
३ डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीच्या औचित्याने 'झोंपाळ्यावरची गीता' या रचनेचा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीत प्रसिद्ध करण्यात आला. The Geeta in Leisure या नावाने हा समश्लोकी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केला आहे.[3] रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने हा अनुवाद प्रसिद्ध केला असून, तो ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे.[4]
मराठी भाषेची संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा मोडून इतर विषयांवरील काव्यरचनेस नवकाव्य म्हणले जाते. कवी कृष्णाजी केशव दामले (केशवसुत) यांना मराठीच्या नवकवितेचे सुरुवात केली म्हणले जाते. रविकिरण मंडळीतील कवींनी कविता समाजाभिमुख केली मात्र त्यांचे समकालीन अनंततनय यांचा नवकवितेला आणि रविकिरण मंडळींना कडाडून विरोध केला असे .अवलोकन भावकवी यशवंत डॉ.सोमनाथ कोमरपंत यांनी केले आहे.[1][5]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.