लेखन From Wikipedia, the free encyclopedia
त्र्यंबक शंकर शेजवलकर (जन्म : कशेळी-रत्नागिरी, २५ मे १८९५; - मुंबई, २८ नोव्हेंबर १९६३) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले होते. ते या साप्ताहिकाचे संपादक होते.
त्र्यंबक शेजवलकर | |
---|---|
टोपणनाव | त्र्यं.शं. शेजवलकर |
जन्म | २५ मे इ.स. १८९५ |
मृत्यू | २८ नोव्हेंबर इ.स. १९६३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहास लेखन |
भाषा | मराठी |
विषय | इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती | पानिपत:१७६१ |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार, १९६६ |
पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर विस्तृत अभ्यास व लेखन करणारे त्र्यंबक शेजवलकर हे पहिले इतिहासकार होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाशी संबंधित सर्व ठिकाणांना स्वतः भेट दिली. आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत हा चित्रपट त्र्यंबक शेजवलकरांच्या पानिपत या ग्रंथावर आधारलेला आहे[1].
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़ संस्थापकांपैकी एक होते.[2] मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते इ.स. १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. एम. ए. ह्या पदवीसीठी त्यांनी मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव ह्या विषयावरील प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता पण परीक्षकांशी मतभेद झाल्याने त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यामुळे शेजवलकरांना एम. ए. ही पदवी मिळाली नाही.[3]
मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. मुंबईच्या कर्नाटक छापखान्याने त्यांच्या संपादकत्वाखाली ८ जून १९२९ रोजी प्रगती हे साप्ताहिक सुरू केले.[3] ते त्यावेळेच्या ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे १९३२ साली बंद पडले.[4] प्रगती साप्ताहिक बंद पडल्याने शेजवलकरांना मानसिक धक्का बसला आणि त्यातून सावरायला त्यांना काही वर्षे लागली. १९३९ ह्या वर्षी पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत (पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये) रूपांतर झाल्यावर तिथे ऑगस्ट १९३९मध्ये त्यांची मराठा इतिहासाचे प्रपाठक (रीडर) म्हणून नेमणूक करण्यात आली.[5] २५ मे १९५५पर्यंत ते ह्या संस्थेत कार्यरत होते.[6] निवृत्तीनंतर त्यांचे इतिहासविषयक संशोधन चालू राहिले. ह्या काळातच त्यांचे निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१ हे ग्रंथ प्रकाशित झाले. मुंबईच्या मराठा मंदिर ह्या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचे काम सोपवले होते. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. २८ नोव्हेंबर १९६३ ह्या दिवशी त्यांचे निधन झाले.
क्रमांक | मिळालेले पुरस्कार व सन्मान | वर्ष | नोट्स |
१ | साहित्य अकादमी पुरस्कार -श्री शिवछत्रपती शोध निबंधासाठी | १९६६ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.