मराठी नाटक From Wikipedia, the free encyclopedia
घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहिलेले मराठी नाटक आहे. १६ डिसेंबर, इ.स. १९७२ रोजी हे नाटक रंगमंचावर आले.[1]या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल, नृत्य दिग्दर्शन कृष्णदेव मुळगुंद तर संगीत दिग्दर्शन भास्कर चंदावरकर यांनी केले होते. घाशिराम कोतवाल हे मानवी मनात दडलेल्या व जीवनातील क्रौर्याचे दर्शन घडविणारे नाटक आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
"हां, आऊंगा, पुने में आऊंगा, बताऊंगा मेरा इंगा, पडेगा- मरेगा, लेकिन अब तुमको छुट्टी नही! हूं कनौजका बम्मन, लेकिन अब हो गया हूं शूद्र गुनहगार,जानवर निकम्मा| नही अब कोई मुझे रोखनेवाला,रुकानेवाला,झुकानेवाला, फसानेवाला.अब हूं मैं शेतान!अंदरसे सैतान और बाहरसे सुव्वर,जो मुझे बनया है तुम लोगोंने|सुव्वर के माफिक आऊगा और शैतान होके रहूंगा! मेरे साथ सबको सुव्वर बनाऊंगा| इस पूने को सुव्वर का राज बनाऊंगा! तबही मेरा नाम घाशीराम और मेरे बाप का नाम सावळाराम सार्थ होगा, हां!" क्रोर्यभावाचे दर्शन घडविणारा हा संवाद घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकरलिखित नाटकातला आहे. क्रौर्यसूत्रच हा या नाटकाचा प्रतिपाद्य विषय आहे.
घाशीराम कोतवाल हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड आहे.यातील नायक घाशीराम सावळादास हा आपले नशीब काढायला कनोजहून पुण्यात येतो. येथील गुलाबी नामक नाचीकडे हरकाम्या गडी म्हणून राहतो. तिथे नाना फडणवीस आणि त्याची भेट घडते. घाशीराम आपल्या सेवेने आणि चतुर वाणीने नानांची मर्जी राखतो. खुश होऊन नाना त्याला कंठा बहाल करतात;पण गुलाबी तो त्याच्याकडून हिसकावून घेते. तो विरोध करू लागतो. गुलाबी आपल्या साथीदाराकरवी त्याला झोडपून रस्त्यावर भिरकावून देते; रमण्यावरही घाशीरामला असाच अनुभव येतो. तिथे घाशीरामवर चोरीचा आळ येतो. त्याला कोठडीत कोंडून पडावे लागते;त्याला हद्दपार व्हावे लागते. या क्रूर अनुभवाने घाशीरामच्या मनात क्रौर्याची, सुडाची भावना जागी होते. याचा सूड घेण्यासाठी घाशीराम प्रतिज्ञा घेतो. सूड उगविण्यासाठी तो प्रथम आपल्या ललितागौरी या तरुण मुलीचा बळी द्यायचा ठरवतो. नानाला तिचा मोह पडतो आणि तिच्या बदल्यात नानाकडून कोतवाली मिळवतो. मानवी जीवनाचे परावलंबित्व,त्यातील अरिष्ट-शोकांची अपरिहार्यता, प्रेम, स्वार्थ, घमेंड,स्नेह, लालसा, इत्यादी मानवी मनानातील मूलप्रवृत्ती यांचे अनेक विणीचे जाळेच या नाटकाच्या प्रयोग रूपाने दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि त्यांच्या चमूने सिद्ध केले आहे.
अपमान, अन्याय यांमुळे घाशीराम क्रूर होतो, तर लंपटपणामुळे व स्वार्थामुळे नाना फडणवीस क्रूर होतात. प्रारंभी घाशीरामला क्रौर्याचा अनुभव येतो तो अनागोंदीमुळे. रात्री अकरानंतर त्याची पुण्याच्या रस्त्यांवरून गस्त सुरू होते. अडलेल्या बायकोसाठी सुईण शोधणाऱ्याला अडविले जाते. मध्यरात्री दारे ठोठावून पतीपत्नींना जागे करून त्यांच्या अधिकृत नात्याची तपासणी केली जाते. पण महत्त्वाचा प्रसंग रमण्यातील चोरीचा. चोरीचा आळ असलेल्या इसमाचा घाशीराम अनन्वित छळ करतो. त्याची नखे काढण्यात येतात-लिंबूसाबणाने धुतली जातात. तापलेल्या लोखंडाचा गोळा त्याच्या हाती दिला जातो. या सर्व छळाने कंटाळून तो कबुली देतो तर त्याचे हात तोडून त्याला पुण्याच्या हद्दीबाहेर फेकण्याची शिक्षा दिली जाते.
ऑक्टोबर १९८० मध्ये ‘घाशीराम’चे प्रयोग लंडनला हॅमरस्मिथमध्ये रिव्हरसाइड स्टुडिओ या नाट्यगृहात सलग आठ दिवस झाले. पहिल्या प्रयोगाला लंडनच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे नाटय़- समीक्षक आले होते. त्यांची पद्धत म्हणजे प्रयोग झाला की परीक्षण लगेच दुसऱ्या दिवशी छापून येते. पैकी ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने सविस्तर परीक्षण तर दिलेच, पण सोबत ‘घाशीराम’ नाटकाच्या शेवटी जे दृश्य दिसते, ते म्हणजे पुढे घाशीराम मरून पडलेला आहे, मागे बामणहरींची रांग उभी आहे, त्या रांगेत नाना फडणवीस समाविष्ट होतात. हे मागे चौथऱ्यावर उभा राहून एक इंग्रज अधिकारी पाहत असतानाच भैरवीच्या सुरावटीत ‘श्रीगणराय नर्तन करी..’ या नमनाच्या ओळी म्हटल्या जातात. आणि ठेका सुरू होताच पडदा पडतो. ‘गार्डियन’ने नेमक्या या शेवटच्या दृश्याचा फोटो छापला; ज्यात इंग्रज अधिकारी मागे उठून दिसतो आणि वर हेडलाइन दिली- ‘नो पन् इंटेन्डेड’ (म्हणजे ‘टीकेविना’ याअर्थी)! कारण १८१८ मध्ये पेशवाई गेली आणि इंग्रज आले, हा इतिहास सर्वश्रुत आहे. हे इतिहासाचे भान त्या समीक्षकाला होते.
१९८६ घाशीराम कोतवालचे ‘थिएटर ऑफ नेशन्स’ या युनेस्कोप्रणीत आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात प्रयोग झाले. हे प्रयोग अमेरिकेत बाल्टिमोर इथे झाले. ज्या नाट्यगृहात हे प्रयोग झाले ते १८४७ मध्ये स्थापन झालेल्या जगप्रसिद्ध जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संगीत विभागात- म्हणजे १८५७ पासून ख्यातकीर्त असलेल्या ‘पीबडी म्युझिक कॉन्झव्र्हेटरी’मध्ये होते. प्रयोगाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकसमूह होता.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.