From Wikipedia, the free encyclopedia
ख्मेर साम्राज्य हे इ.स. ८०२ - इ.स. १४३१ दरम्यान आग्नेय आशियात असलेले एक साम्राज्य होते. आजच्या कंबोडिया व जवळच्या भूप्रदेशावर त्याचा विस्तार होता. यावर ख्मेर राजवंशातील राजांनी राज्य केले.
दुसरा जयवर्मन या चेन्ला राज्याच्या एका शासनकर्त्याला जावा साम्राज्यात बंदी ठेवले होते. बंदिवासातील सुटके नंतर त्याने सैन्याची जमवाजमव करून इ.स.७९० पासून पुढे १२ वर्षे जावा साम्राज्याशी निकराने लढा दिला. इ.स. ८०२मध्ये त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि अशा प्रकारे ख्मेर घराण्याचा आणि आंकोर राजवटीच्या सुवर्ण काळाचा आरंभ झाला. आपल्या राज्यकाळात त्याने कंबोडियाच्या अनेक प्रांतांवर स्वाऱ्या करून आपला राज्य विस्तार केला आणि एकछत्री अंमल प्रस्थापित केला. याबरोबरच त्याने "देवराजा" ही महत्त्वाची प्रथा सुरू केली. राजा हा ईश्वरी अंश असतो, ही हिंदू संकल्पना त्याने प्रत्यक्ष अमलात आणली. निर्विवाद वर्चस्व आणि आधिपत्य स्थापन करून एंगकोर साम्राज्याची पाळेमुळे कंबोडियात घट्ट रोवण्यास या प्रथेचा फार मोठा उपयोग झाला. इतिहासावरून दिसून येते की जयवर्मन आणि त्यानंतरच्या पुढील देवराजांच्या मागे सर्व प्रजा एकजुटीने उभी राहिली आणि एका बळकट साम्राज्य निर्माण झाले. आंकोराचे साम्राज्य सुमारे ६०० वर्षे टिकले.
बऱ्याचशा ख्मेर राजांच्या नावामागे लावली जाणारी "वर्मन" ही उपाधी रक्षणकर्ता या अर्थाने वापरली जाते.
याच वंशातील सूर्यवर्मन दुसरा (राज्यकाळ इ.स. १११३ - इ.स. ११५०) याने जगप्रसिद्ध आंग्कोर वाट या भव्य देवळाची निर्मिती केली. भगवान विष्णूंचे हे मंदिर स्थापत्यशास्त्राचे जगातील एक आश्चर्य मानले जाते. हे देऊळ पूर्ण करण्यास ३७ वर्षे लागली व याकामी सुमारे ५०,००० मजूर राबले असा संदर्भ वाचनात येतो. या वंशातील इतर कलाप्रेमी राजांनीही अशा अनेक मंदिरांची निर्मिती केली.
कालांतराने ख्मेर राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला. असे अनुमान काढले जाते की बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर 'देवराजाची' प्रथा मोडीत निघाली व हळू हळू राज्य विस्तार, नियंत्रण या सर्वांना खीळ बसली. त्यातूनच पुढे हे साम्राज्य कमकुवत झाले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.