From Wikipedia, the free encyclopedia
कोपरगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्याचे मुख्यालय कोपरगाव शहर हे आहे. हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. ते अहमदनगर -मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगर पासून ११५ कि.मी.वर येते. कोपरगावपासून मुंबईचे अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. कोपरगावी राष्ट्रसंत श्री मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज यांचे समाधी मंदिर आहे.
कोपरगाव | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | शिर्डी |
मुख्यालय | कोपरगाव |
क्षेत्रफळ | ७२५.१६ कि.मी.² |
लोकसंख्या | २,७६,९३७ (२००१) |
साक्षरता दर | ६४.०९ |
लिंग गुणोत्तर | १.०७ ♂/♀ |
प्रमुख शहरे/खेडी | पोहेगाव कोकमठाण कोळपेवाडी वारी |
तहसीलदार | श्री बोरूडे |
लोकसभा मतदारसंघ | शिर्डी |
विधानसभा मतदारसंघ | कोपरगाव |
आमदार | श्री .आशुतोष काळे |
पर्जन्यमान | ४४०.२ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |
कोपरगावात फार वर्षांपासून मकरसंक्रांतीला पतंग उडवले जातात. आदल्या रात्रीपासून लहान मुलांपासून मोठी माणसे तयारीला लागतात. आदल्या रात्री मांजा तयार केला जातो.
कोपरगावापासून 1 ते 2 कि.मी. अंतरावर दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांचे मंदिर आहे. ती जागा दैत्यगुरू शुक्राचार्य यांची तपोभूमी होती. त्यांना त्यांची तपश्चर्या सुरू असताना गोदावरीच्या पश्चिम - पूर्व प्रवाहाची अडचण येऊ लागली, म्हणून त्यांची तपश्चर्या भंग होऊ लागली म्हणून त्यांनी त्यांच्या हाताच्या कोपराने गोदावरीचा प्रवाह दूर लोटला. तेथे वसाहत तयार झाली. त्या वसाहतीस ‘कोपरगाव’ असे नाव पडले
कोपरगावपासून शिर्डी (पूर्वीचे कोपरगांव तालुक्यातील) हे गाव साईबाबांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डी ही प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधी आहे. शिर्डीला साईनगर नावाचे रेल्वे स्थानक झाले आहे, तेथे येण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानकावर उतरले तरी चालते. आता 2017 मध्ये नुकतेच शिर्डी येथे येण्यास कोपरगांव तालुक्यातील मौजे काकड़ी या गावात आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील येथे सुरू झाले आहे. कोपरगाव ते शिर्डी हे अंतर रस्त्याने फक्त १५ कि.मी.आहे. कोपरगांव पासून साधारण 5 कि.मी अंतरावर ॐ गुरुदेव जंगलीदास महाराज यांचे शैक्षणिक गुरुकुल आहे.
त्र्यंबकेश्वर ते कोपरगांव टोक (तालुका कोपरगांव) हा परिसर दंडकारण्याचा मानला जातो. त्या परिसरातून गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नदीच्या तीरावर कोपरगाव हे तालुक्याचे ठिकाण वसलेले आहे.
त्र्यंबकेश्वर ते कोपरगांव टोक (तालुका कोपरगांव) हा परिसर दंडकारण्याचा मानला जातो. त्या परिसरातून गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नदीच्या तीरावर कोपरगाव हे तालुक्याचे ठिकाण वसलेले आहे.
गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या तीरावरून प्रभू रामचंद्र व सीता यांचे वनवासकाळात भ्रमण झालेले आहे असे मानले जाते. त्या संदर्भात स्थळ, काळ, घटना व प्रसंगानुरूप अनेक दंतकथा ऐकिवात असून त्यांचा वर्तमान परिस्थितीशी संदर्भ लागू शकतो.
मोर्विस
गोदावरी नदीचा कोपरगाव तालुक्यात प्रवेश मोर्विसपासून होतो. ‘मोर्विस’ या गावाजवळ रामाने मारीच राक्षसाचा वध केला म्हणून मारीच - मारीस - मोर्विस असे शब्दस्थित्यंतर झाले.
चासनळी
राम बाणाने सोनेरी हरणाचा वेध घेत असताना त्याचा नेम चुकून बाण खडकावर घसरत गेला. त्या बाणामुळे खडक कापत गेला. त्या बाणामुळे खडकावर खोल असे तास (नळी) पडले म्हणून त्या ठिकाणी वसलेल्या वसाहतीस (तास) चासनळी असे नाव पडले आहे. शेतकरी शेताला पाणी व्यवस्थित भरता यावे म्हणून पेरणी झाल्यानंतर जमिनीत तास पाडतो व पाणी पिकाला भरतो.तास हा शब्द शेतकऱ्यांच्या परिभाषेतील आहे.
मंजूर
चासगावच्या पूर्व दिशेला मंजूर नावाचे गाव आहे. शिवाजी महाराजांचे वंशज कै. बळवंतराव जयवंतराव राजे भोसले यांचे घराणे तेथे आहे. शाहीर परशुराम व त्यांच्या फडातील गायिका ‘बकुळा’ यांची समाधी मंजूर या गावीच आहे. बकुळेचे एकतर्फी प्रेम परशुरामावर होते. कथा अशी की शाहीर परशुरामाच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर बकुळा वावी गावाहून पळत पळत आली व तिने परशुरामाच्या देहाशेजारी प्राण सोडला! त्या गावात सर्पदंश झालेली व्यक्ती दगावत नाही. गावच्या शिवारात सर्पदंश झालेल्या व्यक्तीस बिरोबाच्या (विरभद्र) मंदिरात आणून ठेवतात. जमलेले लोक सर्पदंश झालेल्या व्यक्तीस जीवदान देण्याची मागणी ढोल-डफाच्या गजरात बिरोबाजवळ करतात. भाविकांची मागणी मंजूर होते. म्हणून त्या गावास मंजूर हे नाव पडले असावे.
घामोरी
‘घामोरी’ नावाचे गाव गोदावरी प्रवाहाच्या डाव्या बाजूला काही अंतरावर आहे. त्या गावाचा उल्लेख धामापूर असा नवनाथ कथाचरित्रात आहे. तेथे अडबंगनाथाची समाधी आहे. समाधीजवळ चिंचेचे झाड असून त्या झाडास ‘गोरक्षचिंच’ असे म्हणतात. त्यास फळे येतात. गरोदर स्त्रीला प्रसूतिवेदना असह्य होत असल्यास गोरक्षचिंच उगाळून देतात. म्हणून बहुतेक घरांमध्ये आढ्याला गोरक्ष चिंचेचे फळ टांगलेले आढळते.
कुंभारी
गोदावरीच्या प्रवाहाच्या दिशेने पूर्वेकडे निघाल्यास ‘कुंभारी’ नावाचे गाव लागते. रामाला वनवास काळात भ्रमण करत असताना ते ठिकाण रमणीय वाटले. त्याने व सीतेने, दोघांनीही तेथे स्नान करून ओल्या वस्त्रांनिशी घागरीने (कुंभ) नदीचे पाणी (वारी) घेऊन, शिवलिंगाची स्थापना केली.म्हणून त्या स्थळास कुंभारी (कुंभ - वारी) असे नाव पडले आहे. शिवाचे मंदिर ‘राघवेश्वर’ नावाने कुंभारी येथे दिमाखात उभे आहे
मुर्शतपूर
प्रवाहाच्या दिशेने थोडे पुढे गेल्यास बाजूस मुर्शतपूर नावाचे गाव आढळते. त्या ठिकाणापासून गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते. दक्षिणवाहिनी प्रवाह शुभ असतो. सीतेस तेथे स्नान करावे असा मोह झाला. परंतु तिच्या अंगावर वल्कले, तिला स्नानासाठी वस्त्र नाहीत, पती बरोबर आहे आणि वेळ तिसरा प्रहर आहे. त्यामुळे विवस्त्र स्नान करणे योग्य नाही! तीला स्नान तर करायचेच परंतु ते कसे या विवंचनेत असताना नदीकाठच्या काही स्त्रिया तेथे आल्या. त्यांनी सीतेचे लावण्य व तिच्या चेहऱ्यावरील कष्टी भाव पाहून त्यांच्यातील मातृहृदय जागे झाले. त्यांनी सीतेला अडचण विचारली. सीतेने तिचा मनोदय व अडचण त्यांना सांगितली. तेव्हा त्या स्त्रियांनी त्यांच्याजवळील काही वस्त्रे सीतेस देऊन त्यांच्या हातांनी तिला स्नान घातले. सीता जणू त्यांना त्यांची आप्त वाटली. तेव्हापासून त्या स्थळास सीता आप्त खेडे व पुढे सीतापखेडे असे नाव पडले. सीतापखेडे हे नाव स्वातंत्र्यानंतर गेले व त्या गावाचे नाव मुर्शतपूर असे पडले.
सोनारी
सीतेचे स्नान झाले. तिने मावळत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेण्यासाठी पश्चिमेकडे तोंड करून, हात जोडून स्तवन केले. तिला उजव्या बाजूने वळत असताना सोन्याच्या चकाकिसारखी हालचाल दिसून आली. कपटी मारीच व सीता यांची प्रथम दृष्टिभेट त्याचवेळी झाली. सोन्याच्या चकाकीचा हरीणरूपी मारीच इकडेतिकडे बागडताना सीतेला स्पष्ट दिसू लागला. सीता त्यावर मोहीत झाली. त्या स्थळाला सोनारी असे नाव पडले आहे.सोनारी हे गाव गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे
माहेगाव
कुंभारी गावाच्या पश्चिमेस गोदावरीच्या उजव्या तीरावर माहेगाव आहे. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे पिताश्री लखुजी जाधव यांच्या वंशजांना माहेगाव येथे देशमुखी मिळाली होती तेव्हापासून माहेगावास माहेगाव देशमुख या नावाने ओळखले जाते.जाधव घराण्यांचे वंशज माहेगाव देशमुख येथे वास्तव्यास आहेत.
मायगांव
मंजूर गावाच्या पूर्वेस गोदावरीच्या डाव्या तीरावर मायगाव आहे.तेथील रहिवाशांना कधीकाळी गोदावरीच्या महापुरात देवीची मूर्ती वाहत येऊन तीरावर रहिवाशांना दिसली, लोकांनी मूर्तीची स्थापना नदीतीरावरच करून छोटे मंदिर बांधले. ती मूर्ती लक्ष्मी आई (माय) आहे, असा दृष्टांत काही भाविकांना झाला. तेव्हापासून त्या ठिकाणास आईमायचे गाव म्हणजे ‘मायगांव’ असे नाव रूढ झाले. देवीच्या कृपेने गावाचा लौकिक वाढून भरभराट झाली, म्हणून त्या गावास मायगाव देवी या नावाने संबोधले जाऊ लागले.
हिंगणी
मुर्शतपूरच्या पश्चिमेस गोदावरीच्या उजव्या तीरावर हिंगणी गाव आहे. पेशवाई काळात त्या गावास 'श्रीमंतांची हिंगणी' असे म्हणत असत. पेशवे नारायणराव यांच्या वधाच्या कटकारस्थानात राघोबादादा यांचा सहभाग होता, म्हणून राघोबादादास कोपरगाव येथे नजरकैदेत ठेवले होते. तो वाडा गोदावरी तीरावर भग्न अवस्थेत आहे. त्यांना स्वतंत्र असे विश्रांतिस्थान असावे म्हणून दक्षिणवाहिनी गोदावरीच्या तीरावर हिंगणी येथे भव्य बांधकाम सुरू केले. वाड्याच्या तीन भिंती पूर्ण असून पूर्वेकडील भिंत नाही. फक्त पाया भरलेला आहे. भिंतीची जाडी तीन मीटरची असून उंची दहा मीटर असावी. बांधकाम दगड, चुना व शिसे यांचे असून खूप भक्कम आहे. तो वाडा 1969 व 2006 या दोन्ही वर्षींच्या महापुरांत पूर्णपणे पाण्याच्या धारेत होता, परंतु वाड्याचे काहीही नुकसान झाले नाही. त्या वाड्यातून कोपरगावच्या वाड्यात जाण्यायेण्यासाठी भुयारी मार्ग आहे असे म्हणतात.वाड्याचे बांधकाम चालू असतानाच राघोबादादांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी हिंगणीच्या वाड्यात केला गेला. राघोबादादांच्या वाड्याची देखभाल पुरातन वस्तू संशोधन खात्याकडे आहे .
डाऊच
गोदावरी प्रवाहाच्या उजव्या तीरावर डाऊच बुद्रुक व डाऊच खुर्द अशी दोन गावे आहेत. दोन्ही गावांच्या मधून दक्षिणोत्तर उमावती (उंबरी) नदी वाहते. राम वनवासात असतानाच त्यांना पिता दशरथाची निधनवार्ता कळली. राम-लक्ष्मण या बंधूंनी त्यांच्या पित्याचे पिंडदान (श्राद्ध) डाऊच खुर्द येथे केले. डाऊचच्या पश्चिमेकडील भाविक लोक पितरांच्या पिंडदानासाठी डाऊचला येतात.तेथे शिवलिंग असून महाशिवरात्रीला छोटेखानी यात्रा भरते.
कासारे-चांदेकसारे-
दंडकारण्यात काशासूर नावाचा दैत्य राहत होता. लोक त्याच्या छळाला त्रासून गेले होते. त्याला अमरत्वाचा वर असल्यामुळे देवही घाबरून होते. सर्व देव मिळून शंकराकडे गेले व त्यांनी शंकरास सर्व हकिकत सांगितली व ते विनवणी करू लागले. तेव्हा शंकरांनी ती जबाबदारी अष्टभैरवांपैकी बालभैरवावर सोपवली. लूटमार, वित्तहानी झाल्यानंतर लोक ‘काशारे? काशारे?’ असे मोठमोठ्याने ओरडून सांगायचे. तेथे त्याकाळी गवळी लोकांचे वास्तव्य होते. तेव्हापासून त्या स्थळास काशारे - काशारे - कासारे असे नाव पडले.
नंतर गवळ्यांनी भीतीपोटी तेथून स्थलांतर केले. त्यांचे वंशज मढी येथे आहेत.काशासूर सोने, चांदी, नगद रक्कम व मौल्यवान वस्तू लुटून ठराविक ठिकाणी ठेवायचा. तेथे पूर्वपश्चिम जांब नदी वाहते. त्या नदीला खडकीनाला असे म्हणतात. त्या नदीच्या काठावर चांदीच्या वस्तू व चांदी साठवत. म्हणून त्या ठिकाणास ‘चांदे’ असे नाव पडले. त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना ‘चांदकर’ म्हणतात. कालांतराने, चांदे व कासारे मिळून त्या ठिकाणास चांदेकसारे असे नाव पडले.
सोनेवाडी व नगदवाडी ज्या ठिकाणी सोने व सोन्याच्या वस्तू लपून ठेवत त्या ठिकाणास सोनेवाडी असे नाव पडले, तसेच, जेथे रोख रक्कम (नगद, कॅश) ठेवली जाई त्या जागेस नगदवाडी असे नाव पडले. सोनेवाडी व नगदवाडी ही दोन्ही गावे चांदेकसारे गावाच्या दक्षिणेस आहेत.
मढी
भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन बाळभैरव दंडकारण्यात दाखल झाले. त्यांनी काशासूराशी युद्ध पाच दिवस केले. परंतु काशासूर अजिंक्य राहिला. बाळभैरव प्रातःकाळी स्नानासाठी डाऊच येथे गोदातीरी गेले, त्यांनी तेथील शिवलिंगाचे पूजन केले. ते तेथून परत येत असताना त्यांना एक तपस्वी दिसले. तपस्वी मुनीने बाळभैरवास सांगितले, की ‘बालका? काशासूराचा वध संसारी माणसाकडून होईल, तू तर बालब्रह्मचारी आहेस.’ ते संभाषण घाटावर स्नान करणाऱ्या काही लोकांनी ऐकले व हा हा म्हणता चोहीकडे वार्ता पसरली. भोजडे (तालुका कोपरगाव) येथील पोटे घराण्यातील चर्मकार समाजातील जोगाबाई नावाची मुलगी जनकल्याणासाठी बालब्रह्मचाऱ्याबरोबर तात्पुरते लग्न करण्यासाठी तयार झाली. लग्न विधिवत झाले. बाळभैरव संसारी बनले. त्यांनी चैत्र शुद्ध चतुर्दशीला हाल हाल करून काशासूराचा वध केला. जोगाबाईने (जोगेश्वरी) बाळभैरवाच्या ब्रह्मचारी व्रताला बाधा नको म्हणून काशासूराचा वध झाल्यानंतर विहिरीत उडी मारून आत्मसमर्पण केले. काशासूराचा वध जेथे झाला, तेथे भैरवनाथ - जोगेश्वरीचे सुरेख मंदिर उभे आहे. चैत्र शुद्ध त्रयोदशीला मोठी यात्रा भरते. त्याप्रसंगी पोटे घराण्यातील वंशजांना मानाचे स्थान असते बाळभैरवाने काशासूराचे प्रेत त्रिशूळावर घेऊन आकाशात भिरकावले. ते प्रेत (मढे) पश्चिम दिशेला उम्रावती नदीत जाऊन पडले. त्या ठिकाणास मढी असे नाव पडले. तेथे मढी खुर्द व मढी बुद्रुक अशी दोन गावे झाली आहेत.
पोहेगाव
प्रेत एवढे मोठे होते, की ते पाहण्यासाठी खूप लोक जमा झाले. पाहण्यासाठी गावच तयार झाले. लोक त्यास म्हणाले ‘पाहा हे गाव’. त्याचेच पोहेगाव निर्माण झाले.
देर्डे
काशासूराचे मृत शरीर कोल्हे, कुत्रे, लांडगे खाऊ लागले. श्वापदांच्या त्या ओढाताणीत त्याचे शरीर (धड) पूर्वेकडे ओढले गेले. त्या ठिकाणास ‘धड रे! धड रे!’ असे म्हणता देर्डे असे नाव पडले. ती गावे देर्डे - चांदवड व देर्डे - कोऱ्हाळे या नावांनी प्रसिद्ध आहेत.
घारी
काशासूराचे मांस खाण्यासाठी गिधाड, घार असे पक्षीही गोळा झाले. घार पक्षांचा थवा खाणे झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी जांब नदीच्या डोहावर जात असे. त्या ठिकाणास घार या पक्षावरून घारी असे नाव पडले. ते गाव चांदेकसारे गावच्या उत्तरेस सलग आहे.
जेऊर
जंगली श्वापदांनी काशासूराच्या छातीचा भाग गोदावरीच्या तीरावर टाकून दिला. छातीला ग्रामीण भाषेत ‘ऊर’ असे म्हणतात. जेथे ऊराचा भाग पडला, त्या ठिकाणास जेऊर असे नाव पडले आहे. जेऊरला जेऊर - कुंभारी व जेऊर - पाटोदा या नावांनी ओळखले जाते.
कोपरगाव
जेऊर गावच्या पूर्वेला गोदावरीच्या उजव्या तीरावर बेट वसाहत होती. ती जागा दैत्यगुरू शुक्राचार्य यांची तपोभूमी होती. त्यांना त्यांची तपश्चर्या सुरू असताना गोदावरीच्या पश्चिम - पूर्व प्रवाहाची अडचण येऊ लागली, म्हणून त्यांची तपश्चर्या भंग होऊ लागली म्हणून त्यांनी त्यांच्या हाताच्या कोपराने गोदावरीचा प्रवाह दूर लोटला. तेथे वसाहत तयार झाली. त्या वसाहतीस ‘कोपरगाव’ असे नाव पडले.
कोकमठाण
कोकमठाण शिव मंदिर हे मंदिर १३ व्या शतकातील आहे. येथे गर्भगृह , अंतराळा आणि मंडप यांचा सामावेशांनी बनलेले असून त्यांच्यावरती बारीक नक्षी काम केले आहे.मंदिराचे शिखर, विटांचे असून, बारीक नक्षीकाम केलेल्या क छोट्या शिखारांपासून बनलेले आहे.मंदिराचा वरचा भाग भौमितिक शैलीने बांधला गेलेला आहे. मंदिराच्या कळसावर मोठे पदक फुलाच्या आकाराचे आहे त्यामुळे शोभा वाढली आहे. त्याच्यावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या मूर्त्याची नक्षीकाम केलेले आहेत.मुख्य शिखरावर लिंग आणि अनंतासायी विष्णू यांचे चित्र आहे.
इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोपरगावाचा समावेश असलेल्या शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे निवडून आले आहेत. त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावातून सौ. स्नेहलता कोल्हे २९७६३ मतांनी विजयी झाल्या आहेत.
राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी कोपरगावहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध असतात/आहे. कोपरगाव बस आगार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून संपर्कास सोयीचे आहे .कोपरगाव येथे रेल्वे स्थानक असून येथून संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करण्यास आगगाड्या मिळतात.कोपरगाव तालुक्यात काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
कोपरगाव तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था :
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.