भारतीय चित्रपट संगीत दिग्दर्शक From Wikipedia, the free encyclopedia
दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन. दत्ता (जन्म : मुंबई, १२ डिसेंबर १९२७. - ३० डिसेंबर१९८७) हे हिंदी/मराठी चित्रपटांना संगीत देणारे एक मराठी संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी ते वयाचे एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आपल्या पित्याच्या मूळ गावी-गोव्यातल्या अरोबा येथे रहायला आले. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील निधन पावले आणि त्यांचा सांभाळ आई, मामा आणि आजी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. त्यांच्या पूर्वजांच्या अरोबा येथील घराच्या जवळ एक खूप जुना विशाल पिंपळाचा वृक्ष होता. त्या झाडाच्या आसपास दर गुरुवारी लोक जमा होत आणिअभंगांची आणि गीतांची मैफल भरे. छोटा दत्ता या गीतांमध्ये रमून जायचा. तेथेच तो हार्मोनियम वाजवायला शिकला. त्याकाळात कोल्हापूरहून आणि रत्नागिरीहून फिरत फिरत येणाऱ्या नाटक मंडळीशी संबंध आला. त्यांच्या नाटकांतली गाणी ऐकायला आणि गायक नटांचा अभिनय पहायला मिळाला. ती गाणी ऐकून दत्ताने आपल्या मामालकडे गाणे शिकायचा हट्ट केला. मामाने उत्तरादाखल छडी दाखवली.
दत्ताने बंड केले. एका रात्री तो चुपचाप घरातून पळाला आणि मुंबईत आला. आल्याआल्या त्याने बी.आर देवधर यांच्या संगीत वर्गात नाव घातले. त्यानंतर जिथून जमेल तेथून संगीताचे ज्ञान मिळवायला सुरुवात केली. फिरताफिरता एन. दत्ता हे मास्टर गुलाम हैदर यांना भेटले आणि त्यांच्या ऑर्केस्ट्रात सामील झाले. गुलाम हैदर यांचे वादनकौशल्य त्यांनी हळूहळू आत्मसात केले.
त्याच सुमारास दत्तांना त्यांचे चंद्रकांत भोसले भेटले. भोसले त्यावेळी शंकर जयकिशन यांच्या वाद्यवृंदात काम करीत. दत्ताही त्यांच्या गटात सामील झाले. ते गातही असत आणि वाजवतही असत. अचानक दत्तांचा संपर्क एस.डी बर्मन (सचिनदेव बर्मन) यांच्याशी आला. दत्तांचे गाणे य़कून बर्मदा खूश झाले. आणी गाण्याचे संगीतही दत्तांचेच आहे हे समजल्यावर त्यांनी दत्तांना आपले साहाय्यक म्हणून घेतले. दत्तांना समजले की ईतकी वर्षे आपण ज्या संगीताचा मागे भटकत होतो, त्या संगीत महासागराच्या काठाशी आपण पोचलो आहोत. यानंतर द्त्तांनी संगीताच्या या महासागरात डुबक्या घेऊन घेऊन आकंठ स्नान केले. पाच वर्षाच्या काळात एन. दत्ता यांनी बुझदिल (१९५१), सजा (१९५१), बाजी (१९५१), बहार (१९५१), जाल (१९५२), जीवन ज्योति (१९५३) यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी सचिनदेवांचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. बाजी आणि जालचे शीर्षक संगीत पूर्णपणे एन. दत्तांचे होते.
एन. दत्तांच्या संगीतात गोव्याच्या संगीताचा बाज असलेले पाश्चिमात्य संगीत, ॲकाॅर्डियनचे मध्यम मध्यम सूर, ऑर्गन व कास्टानेट्स (लाकडी टाळां)च्या आवाजांचा मिलाफ आणि व्हायोलीनची धून यांचा मनसोक्त वापर असे.
संगीतकार सी. रामचंद्र आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलालचे गुरू ॲॅंथनी गोनसालव्हिस हे एन. दत्तांचे चांगले मित्र होते. ॲॅंथनी गोनसालव्हिस यांनी एन. दत्तांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासाठी संगीत नियोजनाचे काम केले. त्यांच्याच नावाचा उल्लेख असलेले 'अमर अकबर ॲंथनी' चित्रपटातले 'माय नेम इज ॲंथनी गोनसाल्हिस' हे गाणे रचलेले होते. ॲॅंथनी गोनसालव्हिस यांच्या खेरीज एन. दत्तांना त्यांचे गोवेकर मित्र चिक चाॅकलेट, जो गोम्स व जाॅन गोम्स, फ्रॅंक फर्नांड, सबॅस्टियन आणि दत्ताराम यांनी संगीतसृष्टीत स्थिरावण्यास मदत केली.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.