ब्रिटिश समाजवादी कार्यकर्त्या, लेखिका, व्याख्यात्या From Wikipedia, the free encyclopedia
अॅनी बेझंट (जन्म: १ ऑक्टोबर १८४७ लंडन - मृत्यू २० सप्टेंबर १९३३, मद्रास, ब्रिटिश वसाहत) या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होत्या. लेखिका आणि व्याख्यात्या म्हणून विख्यात होत्या. त्या स्त्री-सुधारणावादी होत्या.
• भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला. • १८९३ मध्ये भारतात आगमन. • १९१४ 'न्यू इंडिया' वृत्तपत्र काढले. • १९०७ 'जागतिक थिऑसॉफिकल' सोसायटीची अध्यक्षा.
अॅनी बेझंट यांचे जीवन भारतीय अध्यात्मामुळे फुलले. 'थिऑसॉफिकल सोसायटी' ही त्यांची संघटना. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्या सहभागी झाल्या. १९१७ च्या कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. त्यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि सामाजिक सेवा केली.
त्यांचे वडील विल्यम पेजवुड हे त्या ८-९ वर्षांच्या असतानाच वारले. आई एमिली मॉरिस आर्थिक संकटात सापडली. तिच्या मैत्रिणीने अॅनीला आपल्या घरी नेऊन तिचे पालनपोषण केले. १८६६ सालात ईस्टर सणाच्या वेळी ॲनीच्या तिच्या भावी पतीशी ओळख झाली. ते केंब्रिज विद्यापीठाचे पदवीधर होते, तसेच धर्मोपदेशक होते. त्याचं नाव रेव्हरंड फ्रॅंक बेझंट होते. वयाच्या १९-२० व्या वर्षी त्यांचे ॲनीशी लग्न झाले. [1] तिला फुरसतीच्या वेळात पुस्तके वाचावी, आदर्शाचा विचार करावा याची आवड होती, मात्र फ्रॅंक यांना मात्र ॲनी यांनी त्यांच्या मर्जीनुसार वागावे असे वाटायचे. त्यांना दोन मुलेही झाली. पण ती दोघेही वारंवार आजारी पडू लागली. ईश्वरभक्ती व सदाचरणी असूनही मुले आजारी पडतात, यामुळे त्यांची ईश्वरावरील श्रद्धा पार उडाली. पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला व त्यांनी घटस्फोट घेतला. अॅनी बेझंट आईकडे राहायला आल्या. तीही अॅनीच्या दुःखाने खचली व मरण पावली.
याच काळात विचारवंत चार्ल्स ब्रॅडलाफ यांच्याशी अॅनीशी गाठ पडली. त्या स्त्री-सुधारणावादी होत्या. ब्रॅडला यांच्या नॅशनल रिफॉर्मरमध्ये त्यांनी सहसंपादिका या नात्याने अनेक लेख लिहिले.
मॅडम हेलेना ब्लाव्हॅटस्की या थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्याशी अॅनीची गाठ पडली. त्यांचा 'सीक्रेट डॉक्ट्रिन' हा ग्रंथ अॅनीने वाचला. जगाचा सांभाळ करणारी एक अदृश्य शक्ती आहे व ती सदैव सावध आहे. यावर अॅनीचा विश्वास बसला व त्या विचारप्रचारासाठी १८९३ साली त्या भारतात आल्या. 'जन्माने ख्रिश्चन व मनाने हिंदू' असे त्या स्वतःबद्दल नेहमी म्हणत. १९०७ मध्ये बेझंट थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा झाल्या.[2]
बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या संस्थापकांपैकी बेझंट या एक होत्या.
लोकमान्य टिळकांसोबत त्यांनी 'होमरूल' चळवळ उभारली. भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
त्या १९१७ साली झालेल्या 'इंडियन नॅशनल काँग्रेस'च्या अध्यक्षस्थानी होत्या.[2]
माँन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा याविषयी श्रीअरविंद घोष यांनी काही प्रतिक्रिया द्यावी म्हणून बेझंट यांनी त्यांना विनंती केली होती. बऱ्याचदा त्यांच्याकडून अशी विनवणी करण्यात आल्यामुळे अखेरीस श्रीअरविंद यांनी 'न्यू इंडिया'मध्ये एक लेख लिहिला होता. तो दि १० ऑगस्ट १९१८ रोजी प्रकाशित करण्यात आला. आपले नाव त्यामध्ये उघड केले जाऊ नये अशी अट त्यांनी बेझंट यांना घातली होती. तेव्हा लेखकाच्या नावाऐवजी 'ऍन इंडियन नॅशनॅलिस्ट' अशा नावाने तो लेख छापण्यात आला होता.[3]
बेझंट या समाजवादी विचारसरणीच्या होत्या. इ.स. १८७५ मध्ये चार्ल्स ब्रॅडलाफ या समाजवादी विचारवंताबरोबर त्यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा 'द फ्रुट्स ऑफ फिलॉसॉफी' हा प्रबंध लिहिला. या लिखाणाबद्दल दोघांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर अपिलात ही शिक्षा रद्द करण्यात आली. हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला.
'न्यू इंडिया' या मद्रासवरून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राच्या संपादिका म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या.[4]
जे. कृष्णमूर्तींना त्यांनी आपला मानसपुत्र मानले. भारतीय संस्कृतीचा त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. शिक्षण, समाजसुधारणा, स्वतंत्रता आंदोलनात त्यांनी भाग घेतला व २० सप्टेंबर, १९३३ रोजी या जगाचा निरोप घेतला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.