From Wikipedia, the free encyclopedia
प्रस्तुतच्या लेखात सोलापुरी शहरातील बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्रीयदृष्ट्या विचार करता सोलापुरी बोलीभाषा ही स्वतंत्र बोली ठरत नाही. कारण सोलापुरी भाषेची प्रमाणभाषेहून वेगळी अशी भाषिक रूपे सिद्ध झालेली नाहीत. बोली होण्याकरिता स्वतंत्र शब्दरूप, अर्थरूप, औच्चारिक रूप सिद्ध व्हावे लागते. बोलीभाषा ही प्रमाणभाषेहून दुसऱ्या भाषेइतकी वेगळी नसते; पण तिचे वेगळेपण जाणवते. असा वेगळेपणा सोलपुरी बोलीभाषेत जाणवत नाही. या बोलीभाषेत प्रमाणभाषेहून वेगळी जाणवणारी काही वैशिष्ट्ये आहेत, पण ती सोलापूर शहरातील उद्योगधंदे, बहुभाषिक लोक यांमुळे तयार झाली आहेत.. . [1][1]
सोलापूर हे एक गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होते.[2] अशा कामांकरिता अल्पशिक्षित, प्रशिक्षित कामगारांची आवश्यकता असते. ती गरज मोठ्या प्रमाणात शेजारील कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमुळे पूर्ण होई. मध्ययुगीन कालापासून शेजारच्या परगण्यांतील लोक सोन्नलग्यात ( सोलापुरात ) येत राहिले. शहराच्या नैर्ऋत्येस कर्नाटकातील गुलबर्गा जिल्हा व दक्षिणेस विजापूर जिल्हा तर आग्नेयेस आंध्र प्रदेशातील हैदराबाद जिल्हा हे शेजारील प्रदेश आहेत; यांत अंतर जास्त नसल्याने येथे मध्ययुगापासून लोकांचा ओघ येत राहिला. सामाजिक स्थितीचा विचार केल्यास हे शहर बहुधर्मीय आहे. मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मीय आहेत. पुन्हा त्यामध्ये ब्राह्मण, लिंगायत, मराठा, वीरशैव, चांभार, ढोर, मातंग, साळी, सावजी, तसेच बौद्धधर्मीय, जैनधर्मीय, ख्रिश्चनधर्मीय आणि हिंदूंच्यानंतर, मोठ्या प्रमाणात मुसलमान, आहेत. याशिवाय पारधी, लमाण, वैदू, कुडमुडे वैदू, जोशी, ग्वाल्ल, भिल्ल अशा जमातीसुद्धा आहेत. आणि हे लोक आपापल्या भाषेंसह आहेत. त्यामुळे हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू या भाषांच्या संपर्कामुळे मराठीची काही वैशिष्ट्यपूर्ण रूपे येथे पहायला मिळतात.
बोलीभाषेत प्रमाणभाषेची अपभ्रंश रूपे वापरली जातात. ही रूपे प्रमाणभाषेपासून वेगळी सिद्ध होत नाही. ती आणखी एकदोन वर्ण येऊन आलेली आहेत. सोलापुरी बोलीभाषेत सर्वनामांची रूपे फार मजेदार होतात. उदा० हा - ह्यनं ऽऽ, एकवचनी रूप ह्यनीSS; तो - तनंऽऽ, वचनी रूप, अनेकवचनी रूप त्यवनी.
ते - एकवचनी; तनीऽऽ; अनेकवचनी व आदरार्थी रूप त्येनी.
या - ह्यवनी
त्या - त्यवनी
सर्वनामांची अशी रूपे वापरली जातात. अनुल्लेखाने बोलता बोलता सोलापुरी बोलीभाषेत अनुस्वाररूपी खडा मारण्याची जहाल प्रवृत्ती आहे. उदा०
‘हेबग् हे अलं! / ह्यबग हे आलं:’ , ‘त्येबक् ते आलं! / त्यबक् ती आलं!’, ‘त्येबक ते तित् पडलंय! / त्यबकSS तितSS पडलाय!’ इत्यादी, इत्यादी.
एकवचनी सर्वनाम रूपांचे – ‘हे’, ‘ते’, ‘ह्यबक’, ‘त्यबक’ अशी नपुंसकलिंगी रूपे योजिली जातात. अशा स्वरूपांच्या नपुंसकलिंगी रूपांमधून न्यूनत्व, गौणत्व दर्शविले जाते. शिवाय आले या ‘एकारान्ती क्रियापदाचे अकारांती रूप न्यूनत्व दर्शविते. आलं / अलं, गेलं अशी रूपे करून अधिक्षेप दर्शविला जातो; कधी नापसंती आणि तुच्छताही दर्शविली जाते. तद्वतच अनौचित्यही अपेक्षित असते.
प्रमाणभाषेत व लिखित स्वरूपाच्या शुद्धाशुद्धविवेकात शब्दांतील वर्णाचा स्वतंत्र आणि स्पष्ट उच्चार असतो. प्रमाणभाषेत उच्चारांचेही नियमन केले जाते. बोलीभाषेत औच्चारिक नियमन केले जात नसते. बोलीभाषेत कर्मालाच क्रियापदाचे रूप दिले जाते. आणि अक्षरे जोडाक्षरे केली जातात. उदा : अल्ला, गेल्ला, अल्ती, जेव्लो, जेव्ल्ये, हन्ला, फेक्ला, झोप्ली, इत्यादी. बोलून मोकळे होण्याची घाई, न्यूनगंड, अज्ञान यामुळे असे घडते. क्रियात्मक रूपांपुढे क्रियापदाचे पूर्णत्व देण्याची गरज वाटत नाही; त्याबाबतीत अज्ञान हेच खरे कारण म्हणावे लागेल. ‘तो गेलेला’ असे क्रियापदविरहित वाक्य गेलेला ‘होता / नव्हता’ असे क्रियापद अपेक्षित असते. होकारार्थी किंवा नकारार्थी रूप अपेक्षित असताना ते बहुधा होकारार्थी क्रियापदाचे रूप अध्याह्रत असते. गेल्ता / गेल्ती अशा रूपांच्या उपयोजनेतून क्रियेच्या पूर्णतेची संदिग्धताच नष्ट केली जाते.
लिंगनिश्चितीच्या बाबतीत सोलापुरी भाषेत खूप मोठा गोंधळ दिसतो. व्यक्तीच्या बाबतीत शंभर टक्के अचूकता असते; परंतु शब्दरूपांच्या बाबतीत हा गोंधळ शंभर टक्के आहे. चहा, कॉफी, भात, ट्रक, एस.टी. इत्यादी शब्द नेहमीच ‘गोंधळ’ घालतात. (१) चहा – पुल्लिंगी शब्द. पण योजणाऱ्याच्या लिंगाप्रमाणे तो स्त्रीलिंगी / पुल्लिंगी होतो. (२) कॉफी – स्त्रीलिंगी शब्द. पण योजणाऱ्याच्या लिंगाप्रमाणे तो स्त्रीलिंगी / पुल्लिंगी होतो. (३) एस. टी. बस – स्त्रीलिंगी शब्द. (४) ट्रक – पुलिंगी शब्द. मात्र तो स्त्रीलिंगी योजतात. कन्नड, हिंदी, तेलुगू या भाषांच्या अतिवापरामुळे लिंग व्यवस्थापनातील गोंधळ दिसतो. सुघड भाषारूपाची आवड नसणे, शब्दरूपाचे नेमके अज्ञान असणे व भाषा या सुंदर माध्यमाची अनास्था इत्यादी अनेक कारणे सांगता येतील.
बोलीभाषेत नादमधुरता असते. त्या नादमधुरतेमुळे बोलीमधील गोडवा वाढतो. नादासह लय अपेक्षित असते. लय संवेदनक्षम असते. बोली अनेक भाषांच्या संपर्कात येतात. तेव्हा लयीची मात्रा वाढते. मूळ उच्चारापेक्षा वाढलेल्या मात्रेच्या लययुक्त औच्चारिक रूपाला ‘हेल’ म्हणतात. सोलापुरी भाषेत हेलकारी शब्दांची योजना असते. कन्नड आणि तेलुगू या भाषांचा हा परिणाम. कानडीमध्ये ‘आ’कारान्त आणि ‘उ’कारान्त शब्दांत अधिक हेल आहेत. बंदिल्ला, उन्दिल्ला, बित्तील्ला, होगील्ला अशी ‘ल्ला’ युक्त म्हणजे ‘आ’कारयुक्त शब्दयोजना मोठ्या प्रमाणात आहे. माडबेक्कू, होगाबेक्कू, उनबेक्कू, आडबेक्कू अशी आज्ञार्थी ‘ऊ’कारयुक्त शब्दरूपेही कानडीत मोठ्या प्रमाणात आहेत. कानडीत, ‘अ’, ‘उ’, ‘आ’, ‘ऊ’, ‘ओ’ अशी हेलकारी रूपे अनेक आहेत. कन्नड भाषकांच्या संपर्कामुळे सोलापुरी बोलीभाषेत हेलयुक्त रूपे आली आहेत. ‘अलावंऽऽऽ‘, ‘गेलावंऽऽऽ‘, ‘जेवलावंऽऽऽ‘, ‘बसलावंऽऽऽ‘, ‘खाल्लावंऽऽऽ‘ असे ‘अ’चे हेल आहेत. ‘येकिब्बेऽऽ‘, ‘जाकिब्बेऽऽ‘, असे ‘अबेऽऽ‘, ‘तूबेऽऽ‘ असेही ‘ए’कारयुक्त हेलही कानावर येतात. आलोऽऽ, गेलोऽऽ, जात्तोऽऽ, गेल्तोऽऽ, व्हतोऽऽ, झ्झोपतोऽऽ, इत्यादी ‘ओ’युक्त हेलपद्धतीची प्रवृत्ती दुणावत असलेली दिसून येत आहे. ‘अ’कारयुक्त हेल तेलुगूचा तर ‘उ’, ‘व्या’, ‘ओ’ असे हेल कानडीपासून निर्माण होतात. कानडीच्या संपर्कामुळे ती प्रवृत्ती सोलापुरी मराठीत डोकावत आहे. तसेच शुष्क, कोरडे तापमान, ओसाड भाग, कामाधंद्याचा अभाव यांमुळे जीवन व्यवहारात त्रस्तता आहे. या वृत्तीमुळेही हेल काढले जातात.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.