नाताळ सणाशी संबंधित व्यक्तिरेखा From Wikipedia, the free encyclopedia
सांता क्लॉज (मराठी नामभेद: सँटा क्लॉज ; इंग्लिश: Santa Claus) हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक पात्र आहे. सांता क्लॉजाचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे.[1] सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा ख्रिश्चन लोकांमधे समज आहे.[2] जगभरातील लहान मुलांचे सांताक्लॉज हे अनोखे आणि आवडते पात्र आहे. बालमनावर सांता क्लॉजच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली आहे.[3] पाश्चिमात्य देशात विशेषतः युरोपात आणि भारतातही हा नाताळ हा सण उत्साहाने साजरा केला जातो. सुमारे महिनाभर आधीपासून या सणानिमित्त आयोजन सुरू होते.
सांता क्लॉज हा सेंट निकोलस, क्रिस क्रीनगल, नाताळ बाबा किंवा नुसताच संता अशा विविध नावांनी ओळखला जातो. चौथ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू संत निकोलस हे भक्तांना भेटवस्तू देत असत. त्यांच्यापासूनच सांता क्लॉज या संकल्पनेचा आधुनिक काळात उगम झाला असावा, असे मानले जाते.[4] ब्रिटिश आणि डच संस्कृतींमध्ये उदयाला आलेली "सांता क्लॉज" जी संकल्पनाही तेथूनच आलेली असावी. नाताळचा उगम प्राचीन पगान संस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचत असल्याने पगानच्या हिवाळी सणाशीही सांताचे नाते मानले जाते.
सांता क्लॉज ही व्यक्तिरेखा लाल रंगाचा आणि पांढरा फरचा पोशाख घालते. त्याला पांढरी लांब दाढी असते. वयस्कर रूपातील या व्यक्तीने काही वेळेला चष्मा लावलेला असतो. पायात काळे बूट कमरेला काळा पट्टा, हातात किंवा पाठीवर खाऊ आणि खेळणी यांनी भरलेली मोठी कापडी पिशवी असे याचे रूप असते. १९व्या शतकात अमेरिका आणि कॅनडा मध्ये सांता क्लॉजचे हे विशिष्ट रूप अधिक लोकप्रिय झाले.[5]
मध्ययुगात त्यांच्या स्मरणार्थ ६ डिसेंबर या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा नंतरच्या काळातही सुरूच राहिली फक्त संत निकोलस यांच्या ऐवजी सांता क्लॉज असे नाव झाले आणि मुलांना भेटवस्तू देण्यासाठी नाताळची पूर्वसंध्या हा दिवस निवडला गेला.[8]
संत निकोलस आणि नाताळ बाबा (Father Christmas) या दोन संकल्पनांचे एकीकरण होऊन त्यातून सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा प्रचारात आली आहे असे मानले जाते.
थॉमस नास्त नावाच्या लेखकाने सांताक्लॉजचे घर ही नवी संकल्पना मांडली. उत्तर ध्रुवाच्या बर्फ़ाळ प्रदेशात सांताक्लॉजचे निवासस्थान आहे. जगभरातील हजारो मुले सांताक्लॉजला त्याच्या घरच्या पत्त्यावर पत्रे पाठवीत असतात.[10] आणि नाताळच्या रात्री बर्फ़ावरून घसरत आपल्या गाडीवरून तो मुलांना भेटण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी येतो ही कल्पना लहान मुलांच्या कथा, गाणी यामधून अधिक लोकप्रिय झाली. आपल्या हातातील घंटा वाजवत, मेरी ख्रिसमस अशा नाताळच्या शुभेच्छा देत सांताक्लॉज येतो अशी काल्पनिक धारणा आहे.[11] सांताक्लॉज या विषयावरील विविध पुस्तकेही लेखकांनी लिहिलेली आहेत.[12][13] आपल्या निवासस्थानातून सांताक्लॉज एक आकाशवाणी केंद्रही चालवितो.[14] चित्रपट, मालिका याद्वारेही लहान मुलांसाठी सांताक्लॉज व्यक्तीरेखेचे चित्रण केले जाते.[15]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.