From Wikipedia, the free encyclopedia
मेळघाट अभयारण्य व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत. या अभयारण्यामध्ये वन्य प्राणी, रानपक्षी, सरपटणारे प्राणी यांचे व जलपक्षी यांचे संरक्षण केले जाते. सरपटणा-या प्राण्यामधे घोणस, मण्यार, फुरसे, फड्या नाग, अजगर, धामन, हरणटोळ, वृक्षसर्प या सापांचा सामवेश आहे. रंग बदलणा-या शॅमेलिऑन सरड्यांसह पाच् प्रकारचे सरडे मेळघाट अभयारण्यात आढळतात. अभयारण्यातून वाहणा-या नद्यांमध्ये २० प्रकारचे मासे आहेत. डोहामध्ये मगरी व घोरपडी असतात. [1]
मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सद्यस्थितीत प्रकाल्पाअंतर्गत ६७६.९३ वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे.
मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.
लोकगीतातल्या
दिन दिन दिवाळी |
गाई म्हशी ओवाळी ||
या ओळी गाईंचीच नव्हे तर म्हशींचीही पूजा होते हे सांगतात.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.