बालोद्यान पद्धति
From Wikipedia, the free encyclopedia
बालोद्यान पद्धति : (किंडरगार्टन). सामान्यपणे ३ ते ५ वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेली शाळा. मराठीत बालकमंदिर ही संज्ञाही रूढ आहे. फ्रीड्रिख फ्रबेल (१७८२–१८५२) हा जर्मन शिक्षणतज्ञ बालोद्यानाचा आद्य प्रवर्तक होय.त्याने फ्रँकफ्रुर्ट, इव्हरडन इ. ठिकाणी अनुक्रमे १८०५, १८०७ मध्ये पेस्टालोत्सीच्या तत्त्वानुसार शाळा चालविल्या. पुढे १८३७ साली ब्लांकेनबर्ग येथे त्याने पहिल्या बालोद्यानाची स्थापना केली. इव्हरडन येथे त्याला योहान हाइन्ऱिक पेस्टालोत्सी या शिक्षणतज्ञाचे सान्निध्य व मार्गदर्शन लाभले आणि त्याचे शिक्षणविषयक विचार परिणत झाले. शिक्षणपद्धतीची सारभूत अशी पुढील तीन सूत्रे त्याने निश्चित केली : (१) बालक हा शिक्षणाचे केंद्र असावा. (२) अध्यापकांची मुलांशी वागणूक प्रेमळपणाची असावी. (३) अध्ययनात पुस्तकी विद्येपेक्षा गाणी, खेळ, उत्स्फूर्त कामे यांस प्राधान्य द्यावे. या तत्वांनुसार फ्रबेलने शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले. स्वित्झर्लंड येथील शिक्षक प्रशिक्षण कार्यात त्याला प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व पटले. सत्प्रवृत्त व सहकारी समाज निर्माण करण्याचे ध्येय अनुरूप शिक्षणाने साध्य होऊ शकेल, हे जाणून शिशुशिक्षणाची आदर्श पद्धती शोधून काढण्याच्या मार्गास तो लागला. या मार्गातील पहिले पाऊल म्हणजे १८३७ मध्ये ब्लांकेनबर्ग येथे स्थापलेले बालोद्यान होय.