From Wikipedia, the free encyclopedia
फॅसिझम हे २०व्या शतकाच्या सुरुवातीस मध्य-युरोपात ठळकपणे दिसू लागलेले, मूलगामी अधिकारशाही राष्ट्रवादाचे एक रूप आहे. फॅसिझमच्या समर्थकांना किंवा फॅसिझमनुसार राज्यकारभार चालवणाऱ्यांना "फॅसिस्ट" म्हणले जाते. राष्ट्रीय सिंडिकेटवादाने प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान इटलीमध्ये उदयास आल्या. फॅसिझममध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा उजव्या विचारसरणीच्या भूमिकेचा आणि डाव्या विचारसरणीच्या राजकारणाचा संगम करण्यात आला होता. फॅसिझमचे हे वैशिष्ट्य उदारमतवाद, मार्क्सवाद आणि पारंपरिक पुराणमतवाद ह्यांच्या विरुद्ध आहे. डाव्या-उजव्या विचारधारांच्या पारंपरिक मोजपट्टीवर फॅसिझमला सहसा कट्टर उजव्या बाजूचे मानले जाते, पण काही समीक्षकांनी आणि स्वतः फॅसिस्टांनी फॅसिझमची अशी मांडणी पुरेशी नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे.
राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून एका सर्वंकषसत्तावादी राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. जो पक्ष फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनःस्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल अशा पक्षाची निर्मिती हे फॅसिस्टांचे ध्येय होते. जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रती भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि लष्करसत्तावादावर विशेष जोर, वगैरे.. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि साम्राज्यवाद ही राष्ट्रीय आनंद पुनर्जागृत करण्याची साधने आहेत. फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे.
फॅसिस्ट विचारधारा पुनःपुन्हा राज्याच्या श्रेष्ठत्वाचा पुनरोच्चार करते. इटली येथील बेनितो मुसोलिनी आणि जर्मनी येथील अॅडॉल्फ हिटलर ह्यांनी स्वतःला राज्याचे मूर्तिमंत रूप म्हणून प्रस्तुत केले व त्याआधारे स्वतःच्या निर्विवाद निरंकुश सत्तेचा दावा केला. फॅसिझमचे सिद्धान्त, संकल्पना आणि संज्ञा हे समाजसत्तावादाकडून उधार घेतलेले आहेत. मात्र समाजसत्तावादाच्या केंद्रस्थानी वर्गसंघर्षाचा मुद्दा होता, तर फॅसिझमने त्याला बदलवून त्याजागी परराष्ट्रसंघर्ष आणि वंशवाद ह्यांना स्वतःचा आधार बनवले. स्वदेशी उत्पादनाला देशाच्या बाजारपेठेत संरक्षण देऊन व आर्थिक धोरणांमध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रीय स्वयंपूर्णता साधणे ह्या मुख्य उद्देशाने फॅसिस्ट लोक मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थन करतात.
दुसऱ्या महायुद्धानंतर काही पक्षांनी स्वतः फॅसिस्ट असल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे. असे असले तरी, "फॅसिस्ट" ही संज्ञा राजकीय विरोधकांद्वारे बहुधा तिरस्कारवाचक म्हणून वापरली जाते. २०व्या शतकातील फॅसिस्ट चळवळींमधून पुढे उदयास आलेल्या विचारधारांना किंवा तत्सम कट्टर उजव्या विचारधारांना अधिक औपचारिकपणे संबोधण्यासाठी "नव-फॅसिस्ट" (neo-fascist) किंवा "उत्तर-फॅसिस्ट" (post-fascist) ह्या संज्ञा वापरल्या जातात.
लॅटिन भाषेतील "fasces" (फॅसेस) ह्या शब्दापासून इटालियन भाषेत "fascismo" (फॅसिझ्मो) ही संज्ञा वापरात आली. फॅसेस म्हणजे एका कुऱ्हाडीभोवती बांधलेला काड्यांचा गुच्छ., हे प्राचीन रोमन नागरी दंडाधिकाऱ्याच्या अधिकाराचे चिन्ह होते. त्याचे लिक्टर्स स्वतःबरोबर फॅसेस बाळगत व दंडाधिकाऱ्याच्या आदेशावरून लोकांना शारीरिक शिक्षा आणि मृत्युदंड देऊ शकत. फॅसिझमो ह्या संज्ञेचा संबंध इटलीमधील "fasci" (फॅसी) नामक राजकीय संघटनांसोबत सुद्धा आहे. फॅसी हे गिल्ड्स किंवा सिंडिकेट्स सारखे गट होते.
फॅसेस हे चिन्ह एकतेच्या बळाचे प्रतीक होते : एकटी काडी सहज मोडेल, पण त्यांचा गुच्छ मोडायला कठीण असतो. विविध फॅसिस्ट चळवळींनी अनेक तत्सम चिन्हे विकसित केली होती. उदाहरणार्थ, "falange" (फॅलांज) ह्या चिन्हात एका जोखडाला एकत्र जोडलेले पाच बाण असत.
"Fascismo" (फॅसिझ्मो)चे इटालियन मधून इंग्रजीत भाषांतर करताना "Fascism" (फॅसिझम) झाले. इंग्रजीतून "फॅसिझम" ही संज्ञा मराठी साहित्यात जशीच्या तशी वापरण्यात आली. पण मराठीत "फॅसिस्टवाद" असाही समानार्थी शब्दप्रयोग केला जातो. हिंदी भाषेत ह्याला "फ़ासीवाद" ही संज्ञा वापरली जाते.
इतिहासकार, राज्यशास्त्र तज्ज्ञ व इतर विद्वानांमध्ये फॅसिझमच्या तंतोतंत स्वरूपावर मतभेद आहेत. फॅसिझमचे प्रत्येक रूप वेगळे आहे, ज्यामुळे त्याच्या केल्या गेलेल्या अनेक व्याख्या एकतर फारच ढोबळ किंवा फारच संकुचित जाणवतात.
फॅसिझमची एक सामान्य व्याख्या पुढील तीन संकल्पनांवर केंद्रित आहे :
अनेक विद्वानांनुसार, फॅसिझमने (विशेषतः सत्तेत आल्यानंतर) ऐतिहासिकपणे साम्यवाद, पुराणमतवाद आणि सांसदीय उदारमतवादावर हल्ला चढवून प्रामुख्याने कट्टर उजव्या विचारसरणीच्या ताकदींकडून समर्थन मिळवले आहे.
राष्ट्रवाद हा फॅसिझमचा मुख्य पाया आहे. फॅसिस्ट दृष्टिकोनानुसार राष्ट्राची संकल्पना म्हणजे जनतेला त्यांच्या समान पूर्वजांच्या नावाखाली संघटित करणारा, जनतेच्या एकजुटीसाठी नैसर्गिक आधार वाटणारा एकमेव घटक. मिलेनारियन राष्ट्रीय पुनर्जन्म साध्य करून, राष्ट्र किंवा वंशाचे इतर सर्व बाबींपेक्षा उदात्तीकरण करून आणि एकता, शक्ती आणि शुद्धतेच्या निष्ठेचा प्रसार घडवून फॅसिझम आर्थिक, राजकीय आणि सामाजिक समस्यांना सोडवू पाहतो. युरोपियन फॅसिस्ट चळवळी विशेषतः अशी वंशवादी संकल्पना अंगीकारतात की गैरयुरोपियन लोक हे युरोपियनांपेक्षा खालच्या दर्जाचे आहेत. असे असले तरी, युरोपियन फॅसिस्टांचा वंशवादी दृष्टिकोन सरसकट एकसारखा नाही. ऐतिहासिकरीत्या, जरी काही फॅसिस्ट चळवळींनी साम्राज्यविस्तारामध्ये विशेष रुची बाळगली नसली, तरीसुद्धा बऱ्याच फॅसिस्टांनी साम्राज्यवादाचा प्रसार केला आहे.
फॅसिझम सर्वंकषसत्तावादी राज्याच्या स्थापनेचे समर्थन करतो. डॉक्ट्रीन ऑफ फॅसिझम ह्या दस्तावेजात सांगितल्याप्रमाणे "फॅसिस्टांची राज्याबद्दलची संकल्पना सर्वसमावेशक असते; त्याबाहेर कोणत्याही मानवी किंवा आध्यात्मिक मूल्याचे अस्तित्त्व असू शकत नाही, (त्याला मूल्य असणे तर दूरच). अशाप्रकारे, फॅसिझम हा सर्वंकषसत्तावादी आहे, आणि फॅसिस्ट राज्य - एक कृत्रिम रचना आणि सर्व मूल्यांना सामावून घेणारी एक संस्था - जनतेच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ लावते, त्याचा विकास घडवते आणि त्याला समर्थ बनवते." द लीगल बेसिस ऑफ द टोटल स्टेट ह्या दस्तावेजात नाझी राजकीय तत्त्वज्ञ कार्ल श्मिट ह्याने "जर्मन लोकांना एकमेकांपासून तोडणाऱ्या प्रलयंकारी विविधतेला" टाळण्यासाठी "सर्व प्रकारच्या वैविध्यापलीकडे जाऊन राजकीय एकतेच्या संपूर्णतेची हमी देणाऱ्या एका बळकट राज्याची" निर्मिती करण्याच्या नाझी मनसुब्याचे वर्णन केले आहे.
फॅसिस्ट राज्ये समाजावर त्यांची तत्त्वे बिंबवण्यासाठी शिक्षणातून आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रचारतंत्र चालवत असत व ह्यासाठी ते शैक्षणिक साहित्य आणि प्रसारमाध्यमांचे नियंत्रण करत. फॅसिस्ट चळवळीचे उदात्तीकरण करण्यासाठी व राष्ट्रासाठी त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम विशिष् टप्रकारे निर्माण केला जात असे. फॅसिस्ट चळवळीच्या विचारांशी अनुरूप नसलेल्या इतर सर्व विचारांचे दमन करणे व विद्यार्थ्यांना राज्याप्रती आज्ञाधारक बनण्यास शिकवणे असा त्याचा उद्देश होता.
फॅसिझम उदारमतवादी लोकशाहीचा विरोध करतो. तो बहुपक्षीय व्यवस्थेला नकारून एकपक्षीय राज्याचे समर्थन करतो. तरीसुद्धा, त्याने लोकशाहीच्या एका रूपाचे समर्थक असल्याचा दावा केला होता.
दुसऱ्या महायुद्धात ध्रुवीकरण झालेल्या शक्तींच्या पराभवानंतर शिल्लक राहिलेल्या पॉप्युलर संस्कृतीत फॅसिझमवर भरपूर टीका केली जाते आणि अशा प्रवृत्तींचा सातत्याने निषेध केला जातो.
फॅसिझमवर होणारी सर्वसामान्य आणि सर्वांत मोठी टीका ही आहे की फ~सिझम ही प्रत्यक्षतः जुलूमशाही आहे.
फॅसिझमला सामान्यपणे हेतुपुरस्सर आणि संपूर्ण गैर-लोकशाही आणि लोकशाही-विरोधी म्हणून लेखले जाते. ॲंथनी आर्ब्लास्टर नामक एका लोकशाही विद्वानाने फॅसिस्टांच्या ’ते लोकशाहीच्या एका स्वरूपाचे समर्थक आहेत’ अशा एका दाव्याची नोंद केली आहे. पण आर्ब्लास्टर ह्यांनी मात्र त्या दाव्याला एक हेतुपुरस्सर असत्य वचन आणि एक पोकळ वक्तृत्व म्हणून संबोधले आहे, आणि असे विशद केले आहे की फॅसिझमचा लोकशाही हा कधीच उद्देश नव्हता. त्यांनी फॅसिझमवर गैर-लोकशाही आणि लोकशाही-विरोधी म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.
काही विद्वानांनी ह्या सर्वसामान्य टीकात्मक दृष्टीकोनाला विरोध दर्शवला आहे. वॉल्टर लॅक्युअर म्हणतात की फॅसिस्ट लोक
'लोकशाही-विरोधी' असल्याचा शिक्का मान्य करतीलच असे नाही. खरे म्हणजे, त्यांपैकी अनेक लोक असा युक्तिवाद करतात की फॅसिस्ट लोक, ज्यात एखाद्या व्यक्तीच्या व्यावसायिक राजकारणाचा, कारकुनी प्रभावाचा व प्रसारमाध्यमांच्या उपलब्धतेचा हस्तक्षेप राहणार नाही, अशा एका अधिक शुद्ध आणि अधिक अस्सल लोकशाहीसाठी लढत होते. राजकीय चळवळीत वैयक्तिक व जवळपास पूर्णवेळ सहभाग असणाऱ्या आणि संपूर्ण जनतेच्या भावनांचे व संवेदनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याचा आदर्श त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा होता.
इटॅलियन फॅसिझमच्या अनेक टीकाकारांचे प्रतिपादन आहे की त्यांची बहुतांश विचारधारा ही निव्वळ मुसोलिनीच्या तत्त्वशून्य संधिसाधूपणाचे उप-उत्पादन होती. मुसोलिनी त्याच्या राजकीय भूमिका निव्वळ स्वतःच्या खाजगी आकांक्षांना जपण्यासाठी बदलत असे व लोकांसमोर सांगताना त्यामागे अर्थपूर्ण हेतू असल्याचा आव आणत असे. इटलीचा अमेरिकन दूत रिचर्ड वॉशबर्न चाइल्ड हा मुसोलिनीसोबत काम करत असताना त्याचा मित्र व प्रशंसक बनला, व तो खालील शब्दांमध्ये मुसोलिनीच्या संधिसाधूपणाची संभावना करतो : जे स्वतःचे हितसंबंध टिकवण्यासाठी परिस्थितीनुसार बदलतात, त्या लोकांसाठी "संधिसाधू" ही तिरस्कारवाचक संज्ञा लागू पडते . मुसोलिनीला ज्याप्रकारे मी ओळखतो, त्यावरून तो ह्या अर्थाने संधिसाधू आहे. त्याचा विश्वास होता की मानवजातीने तत्त्वज्ञानाला चिकटून बसण्याऐवजी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्येच बदल घडवायला पाहिजेत, मग त्या तत्त्वज्ञानांवर आणि कार्यक्रमांवर कितीही आशा आणि प्रार्थना अवलंबून अ्सेनात का.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.