पनामा पेपर्स
From Wikipedia, the free encyclopedia
पनामातील मोझॅक फोन्सेका या कायदेविषयक कंपनीशी संबंधित १.१५ कोटी गुप्त कागदपत्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या शोधपत्रकारांच्या एका जागतिक गटाने पनामा पेपर्स या नावाने उघड केली आहेत.[1] या प्रकरणाला जागतिक शोधपत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठे प्रकरण मानले जात आहे.[2] या कागदपत्रांमध्ये २,१४,००० पेक्षा जास्त ऑफशोअर कंपन्यांबद्दलची विस्तृत माहिती आहे, ज्यामध्ये त्यांचे भागधारक आणि संचालकांची माहितीसुद्धा आहे. यामध्ये जे या कंपन्यांचे भागधारक आणि संचालक आहेत अशा अर्जेंटिना, आइसलॅंड, सौदी अरेबिया, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती या देशातील सध्या सत्तेत असणाऱ्या राजकारण्यांची नावे आहेत. त्याचबरोबर इतर ४०हून अधिक देशातील बडे नेते, सरकारी अधिकारी, जवळचे नातेवाईक, जवळचे सहकारी, विविध सरकारांचे प्रमुख आणि उद्योगपतींची नावे आहेत, ज्यामध्ये ब्राझील, चीन, पेरु, फ्रान्स, भारत, मलेशिया, मेक्सिको, पाकिस्तान, इंडोनेशिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, सिरिया आणि युनायटेड किंग्डम या देशांचा समावेश आहे.[1]
यामध्ये १९७० च्या दशकापासूनच्या कगदपत्रांचा समावेश आसून यातील माहिती २.६ टेराबाइट एवढी आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये एका अनामित स्रोताने सुरुवातीला ही कागदपत्रे जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राकडे दिली आणि नंतर अमेरिकेतील इंटरनॅशनल कर्न्सोटियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट (आयसीआयजे) या गटाकडे दिली. पुढे ही कागदपत्रे ८० देशातील १०७ माध्यम संस्थांतील जवळपास ४०० पत्रकारांना वितरित करण्यात आली आणि त्यांचे विश्लेषण केले गेले. पहिल्या १४९ कागदपत्रांसोबत त्यांतील माहिती ३ एप्रिल २०१६ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आली आणि त्यासंबंधीत कंपन्यांची संपूर्ण यादी मे २०१६ मध्ये प्रकाशित करण्यात येईल.