From Wikipedia, the free encyclopedia
कुलू दशहरा हा हिमाचल प्रदेश मधील कुल्लू व्हॅली म्हणजे कुलू येथील दरी प्रदेशात साजरा केला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे.[1] कुलू दसरा हा सण हिमाचल प्रदेशात आॅक्टोबर महिन्यात साजरा केला जातो.[2]हा एक वार्षिक उत्सव आहे.जगभरातील सुमारे चार ते पाच लाख लोक या महोत्सवासाठी उपस्थित राहतात.कुलू व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागातील ढालपूर मैदान या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो.
शारदीय नवरात्र उत्सवातील दहाव्या तिथीला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सकाळी हा उत्सव सुरू होतो आणि पुढे एक आठवडा सुरू राहतो.
या सणाबद्दल सांगितले जाते की इसवी सनाच्या सातव्या शतकात तत्कालीन स्थानिक राजा जगत् सिंग यांनी प्रायश्चित्त म्हणून आपल्या सिंहासनावर रघुनाथाची मूर्ती स्थापन केली.त्या दिवसापासून कुलू दरी परिसरातील संरक्षक आणि शासक देवता म्हणून रघुनाथाच्या मूर्तीला सन्मान प्राप्त झाला. स्थानिक राज्य प्रशासनानेही या उत्सवाला अधिकृत मान्यता दिल्याने या उत्सवाची ख्याती सर्वदूर पसरली आहे.[3] स्थानिक परंपरेनुसार हा उत्सव वसिष्ठ, माकडाहर, हरिपूर,ठाउवा, मणिकर्ण आणि ढालपूर येथील मैदान येथे साजरा केला जात असे. कालांतराने यात बदल होत आता केवळ ढालपूर येथील मैदान येथे हा उत्सव संपन्न होतो.[4]
तीर्थयात्रा करून परत येताना महर्षी जमदग्नी हे आपल्या मालना येथील आश्रमात आले.येताना त्यांनी डोक्यावर अठरा विविध देवतांच्या मूर्ती आणल्या.या प्रवासात चंद्रखणी तलावाजवळ त्यांना एका भीषण वादळाला सामोरे जावे लागले.या परिस्थितीत तोल सांभाळताना महर्षींच्या डोक्यावरील मूर्ती इतस्ततः विखरून पडल्या. परिसरतील स्थानिक पहाडी लोकांना या विखुरलेल्या मूर्ती सापडल्या आणि त्या एकत्र मांडून त्यांची पूजा अर्चा सुरू केली.तेव्हापासून कुलू दरी परिसरात मूर्तीपूजेला सुरुवात झाली असे मानले जाते.
इसवी सनाच्या सोळाव्या शतकात राजा जगत् सिंह याचे येथील भूमीवर साम्राज्य होते. त्याच्या साम्राज्यात शेती करणाऱ्या दुर्गादत्त नावाच्या एका मजुराकडे मौल्यवान मोती असल्याचे राजाला समजले. हावेपोटी राजाने दुर्गादत्ताकडे मोत्यांची मागणी केली.पण दुर्गादत्ताकडे ज्ञान देणारा असा केवळ एकच मोती होता.मोती दिला नाहीस तर तुला फाशी दिले जाईल असा आदेश राजाने दिल्याने दुर्गादत्ताने स्वतःला अग्नीत समर्पित केले.त्यापूर्वी त्याने राजाला शाप दिला की जेव्हा तू भोजन करशील तेव्हा तुझ्या अन्नाचे रूपातर किड्यांमधे होईल आणि पाण्याचे रूपांतर रक्तामधे होईल. यानंतर पश्चात्ताप झालेला राजा एका ब्राह्मणाकडे प्रार्थना करण्सासाठी गेला. अयोध्या येथून रघुनाथाची मूर्ती आणून ती सिंहासनावर बसवावी असा सल्ला ब्राह्मणाने दिला. अधीर झालेल्या राजाने तातडीने एका ब्राह्मणाला अयोध्या येथे पाठविले. एके दिवशी ब्राह्मणाने अयोध्येतील रघुनाथाची मूर्ती चोरली. आपल्या देवाची मूर्ती कुठे गेली याचा शोध घेत अयोध्येतील नागरिक शरयू नदीकिनारी आल्यावर तिथे त्यांना मूर्ती चोरणारा ब्राह्मण भेटला. त्याने मूर्ती का चोरली असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.ब्राह्मणाने सर्व वृतान्त सांगितल्यानंतर अयोध्येतील भक्तांनी ती मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला. पण अयोध्येच्या दिशेला नेताना मूर्ती खूप वजनदार होई आणि कुलूच्या दिशेने नेताना हलकी होत असे. असे.अशाप्रकारे रघुनाथाची मूर्ती कुलू येथे आल्यावर राजा जगत् सिंह याने मूर्तीचे तीर्थ घेतले आणि आपल्या पापातून त्याची मुक्तता झाली. त्यानंतर रघुनाथ हे कुलू दरी परिसराचे दैवत बनले.[5] या आख्यायिकेनुसार कुलू येथील दसरा सण साजरा केला जातो. रथामधे बसवून रघुनाथाची मूर्ती वाजतगाजत मिरवली जाते.[6]
कुलू येथील या उत्सवात केवळ धार्मिक विधी आणि रथयात्रा होत नसून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. येथील जत्रेचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. स्थानिक कलाकार स्थानिक लोकगीते, लोकनृत्ये यांचे सादरीकरण करतात. शास्त्रीय संगीत, आधुनिक नृत्यप्रकार यांचे सादरीकरण यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.