From Wikipedia, the free encyclopedia
ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ हे एकप्रकारचे गुहांच्या तळावर तयार होणारे भूरूप असते. गुहेच्या छतावरून गळणाऱ्या क्षारयुक्त द्रवांतील क्षारांच्या निक्षेपणामुळे त्यांची निर्मिती होते. खनिजे, लाव्हारस, कोळसा, वाळू इ. सारख्या अनेक पदार्थांपासून ते निर्माण होऊ शकतात.[1][2]
गुहेच्या छतावर अशाच प्रक्रियेमुळे तयार होणाऱ्या भूरूपाला अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात
सर्वसाधारणपणे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ चुनखडकाच्या गुहांमध्ये आढळून येतात.[3] भूपातळीखालच्या गुहांमध्ये ठराविक पी.एच.चे (pH) (आम्लतेचा निर्देशांक) वातावरण असेल तरच त्यांची निर्मिती होते. क्षारयुक्त पाण्याच्या द्रावणांच्या निक्षेपण कार्यामुळे ते तयार होतात. चुनखडी हे या प्रक्रियेत सहभागी होणारे मुख्य क्षार आहे. पाण्यात कार्बन डायअाॅक्साईड वायू विरघळलेला असेल तर त्याची चुनखडकांशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम बायकार्बोनेटचे द्रावण तयार होते.[4]
कधीकधी अधोमुखी लवणस्तंभ आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ लांबीने वाढून एकमेकांस मिळतात आणि तळापासून छतापर्यंत एकसंध चुनखडीचे स्तंभ तयार होतात.
मानवाच्या त्वचेशी संपर्क झाल्यास त्वचेतील स्निग्धपदार्थांमुळे लवणस्तंभांच्या पृष्ठभागाच्या पृष्ठताणात बदल घडू शकतो आणि पुढील वाढेवर परिणाम होऊ शकतो. तसेच रंगातही फरक पडू शकतो.
लाव्हा नलिकांमध्ये सक्रिय लाव्हारस असल्यास ऊर्ध्वमुखी लवणस्तंभांची निर्मिती होऊ शकते. चुनखडीच्या ऊर्ध्वमुखी लवणस्तंभांसारख्याच प्रक्रियेमुळे लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात. पण लव्हारसाचे लवणस्तंभ अतिशय जलद गतीने, म्हणजेच काही तासांत, दिवसांत किंवा आठवड्यांत निर्माण होतात. याउलट चुनखडीचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ निर्माण व्हायला हजारो वर्ष लागतात. लाव्हारस थंड होऊन त्याचा प्रवाह थांबला की ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ वाढायचे थांबतात. म्हणून तुटलेला लाव्हारसाचा ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ पुन्हा उगवत नाही.[1] लाव्हा नलिकेच्या तळावर पडणारा लाव्हारस हा बहुतेक वेळा प्रवाहाबरोबर वाहून जातो, त्यामुळे लाव्हारसाचे ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ दुर्मिळ असतात.
कित्येक गुहांमध्ये ऋतुमानानुसार ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ दिसून येतात.[5] भूपृष्ठावरील पाण्याची गुहेमध्ये गळती झाल्यास तापमान द्रवणांकाखाली असले तर तळावर पडणारे पाणी गोठते आणि ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ तयार होतात. पाण्याचे बाष्प गोठूनही असे बर्फस्तंभ निर्माण होऊ शकतात.[6] ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभ काही तासांत किंवा दिवसांतच तयार होतात. गुहेतील जास्त उष्ण हवा हलकी असल्यामुळे छताजवळ जाते, त्यामुळे ऊर्ध्वमुखी बर्फस्तंभांपेक्षा अधोमुखी बर्फस्तंभ दुर्मिळ असतात.
चुनखडीप्रमाणेच बर्फाचेही छतापासून तळापर्यंत एकसंध स्तंभ तयार होऊ शकतात.
कॉंक्रीटच्या छतांवर आणि फरशीवर अनुक्रमे अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ निर्माण होऊ शकतात. गुहेतील लवणस्तंभापेक्षा त्यांची वाढ जास्त जलद गतीने होते. [citation needed]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.