आल्फ्रेड हिचकॉक
From Wikipedia, the free encyclopedia
सर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक (ऑगस्ट १३, इ.स. १८९९ - एप्रिल २९, इ.स. १९८०) हा इंग्लिश भाषक चित्रपटांचा ब्रिटिश दिग्दर्शक व निर्माता होता. रहस्यपटांतील व मानसशास्त्रीय भयपटांतील नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी तो ओळखला जातो. युनायटेड किंग्डम या त्याच्या मायदेशात मूकपटांमधील व बोलपटांमधील यशस्वी कारकिर्दीनंतर हिचकॉक अमेरिकेतील हॉलिवुड चित्रपटसृष्टीत गेला. ब्रिटिश नागरिकत्व अबाधित राखून इ.स. १९५६ साली तो अमेरिकेचा नागरिक बनला.
आपल्या ५० वर्षाहून दीर्घ कार्यकालावधीत हिचकॉकने स्वतःची एक वेगळ्या व लक्षणीय दिग्दर्शन शैलीसाठी म्हणून ओळख करून घेतली.[1] त्याने कॅमेरा कलाकाराच्या नजरेचा वेध घेईल अशा प्रकारे कॅमेरा वापरण्याची एक नवीन पद्धत अस्तित्वात आणली ज्यामुळे प्रेक्षकांना खाजगीतील दृश्य बघितल्यासारखे वाटेल.[2] प्रेक्षकांची उत्कंठा, भीती किंवा जवळीक ताणावी अशी दृश्ये तो निवडी आणि त्यांचे नवनवीन तऱ्हेने संकलन करी.[2] त्याच्या गोष्टीत बऱ्याचदा कायद्याच्या कचाट्यातून दूर पळणारा पुरुष एका सुंदर बाईसोबत असे.[3]