ॲश वेनसडे
From Wikipedia, the free encyclopedia
ॲश वेनसडे म्हणजे राखेचा बुधवार होय. या दिवसाने ख्रिस्ती उपवासकाळाची (४० दिवसांचा उपवास ) सुरुवात होते. (या उपवासाला इंग्रजीत लेन्ट असे म्हणतात) . हा ख्रिस्ती लोकांच्या उपवासाचा पहिला दिवस असतो. हा ईस्टर सणाच्या ४६ दिवस पुढे असतो (४० दिवस उपवासामध्ये येणारे सर्व रविवार वजा केले जातात.) ईस्टर सणाचा दिवस बदलत असल्याने उपवास काळाची सुरुवातही बदलत असते. याचे कारण असे कि ईस्टरचा दिवस यहुदी लोकांच्या पासोव्हर (पास्क्का) सणावर ठरवला जातो. पासोव्हर सणानंतर येणाऱ्या पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टरचा दिवस ठरऊन त्याआधीचे चाळीस दिवस (येणारे सर्व रविवार वजा करून) उपवासाचे दिवस ठरतात. त्यामुळे राखेचा बुधवार हाही बदलता असतो. हा दिवस साधारण ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान येत असतो.[1] या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजित केली जाते. व भाविकांच्या कपाळावर राख लावली जाते. राख ही पश्चाताप व प्रायश्चित याचे प्रतिक आहे. राख लावताना धर्मगुरू म्हणतात, " हे मानवा तू माती आहेस व शेवटी मातीला मिळशील हे लक्षात ठेव. म्हणून पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा "
नवा करारा नुसार येशू ख्रिस्ताने ४० दिवस उपवास केला. या उपवासा दरम्यान सैतानाने येशूला मोहात पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ख्रिस्ताने या मोहावर विजय मिळविला. [2] या घटनेची स्मृती म्हणून हा उपवास तसेच ख्रिस्ताचे क्रूसावरील बलिदान व त्याचे पुनरुत्थान याची स्मृती म्हणून गुड फ्रायडे व ईस्टर साजरा केला जातो.