एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी
From Wikipedia, the free encyclopedia
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे पूर्ण सभासद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार असोसिएट संघांदरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.[1] एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पुर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात.[2] एकदिवसीय क्रिकेट हे लिस्ट – अ क्रिकेट असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरुवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो;[3] तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे.[4]
विजयांच्या टक्केवारीचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ (आशिया XI क्रिकेट संघ सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती.[5] याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: पूर्व आफ्रिका, ओमान, आणि युएसए,[5] ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.
भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथिया मुरलीधरनच्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच महेला जयवर्धने ह्याने केला आहे.